नवदीप सैनीचे सहा बळी
महाराष्ट्राची बलाढय़ फलंदाजी केवळ कागदावरच आहे, याचा प्रत्यय दिल्लीच्या संघाने रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दाखवला. नवदीप सैनीने सहा बळी मिळवल्याने दिल्लीने महाराष्ट्राचा पहिल्या डावात ८० धावांवर खुर्दा उडवला. उर्वरित खेळात दिल्लीने ४ बाद १५७ धावा करीत खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.
फिरोजशाह कोटला मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या अंगलट आला. दिल्लीच्या नवदीपने केवळ ३२ धावांत सहा फलंदाज बाद करत महाराष्ट्राच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. त्यानंतर ध्रुव शौरी व नितीश राणा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने पहिल्या डावात दिवसअखेर ७७ धावांची आघाडी मिळविली.
वेगवान गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर दिल्लीच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. महाराष्ट्राकडून हर्षद खडीवाले (२१), अंकित बावणे (१६) व संग्राम अतितकर (१६) हे तीनच फलंदाज दोन आकडी धावा करू शकले. कर्णधार रोहित मोटवानी व भारतीय संघाकडून खेळणारा केदार जाधव यांना भोपळादेखील फोडता आला नाही. दिल्लीकडून नवदीपने ३२ धावांत सहा बळी मिळविले. प्रदीप संगवान (२/१९) व मनन शर्मा (२/२५) यांनी त्याला चांगली साथ दिली.
दिल्लीने उन्मुक्त चंद (४) व गौतम गंभीर (३) यांना झटपट गमावले. मात्र त्यानंतर शौरी व राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. शौरीने नाबाद ५४ धावा करताना पाच चौकार व दोन षटकार अशी आतषबाजी केली. राणाने नऊ चौकार व एका षटकारासह ५९ धावा केल्या. महाराष्ट्राकडून श्रीकांत मुंडे याने दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : २५.४ षटकांत सर्व बाद ८० (हर्षद खडीवाले २१, अंकित बावणे १६, संग्राम अतितकर १६, नवदीप सैनी ६/३२, प्रदीप संगवान २/१९, मनन शर्मा २/२५). दिल्ली (पहिला डाव) : ५२ षटकांत ४ बाद १५७ (ध्रुव शौरी खेळत आहे ५४, नितीश राणा ५९, श्रीकांत मुंडे २/४८) .

Story img Loader