राष्ट्रीय संघटनेचे निरीक्षक अनुपस्थित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेवर बरखास्तीची टांगती तलवार असतानाच राष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने मंगळवारी झालेल्या निवडणुकीसाठी निरीक्षकच न पाठवल्यामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या निवडणुकीत सर्व नियम धाब्यावर बसवल्यामुळे राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने राष्ट्रीय क्रीडा धोरणानुसार प्रत्येक राज्य संघटनेला नोंदणी असल्याची अधिकृत कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र राज्य बास्केटबॉल संघटनेची धर्मादाय आयुक्तांकडे संगणकीय नोंदणीच नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्याने कागदपत्रे सादर करण्यात विलंब होत होता. त्यातच संघटनेने मंगळवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात सर्वसाधारण सभा बोलावून निवडणूक उरकली. राज्य संघटनेला संलग्न असलेल्या अनेक जिल्हा संघटनांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून निवडणूक पार पाडण्यात आली.

विद्यमान अध्यक्ष खा. पूनम महाजन यांच्या सही-शिक्क्यानिशी काही व्यक्तींना स्नेहसंमेलनाचे निमंत्रण पाठवून बोलावण्यात आले. त्यापैकी एकाला जळगाव जिल्ह्य़ाचा प्रतिनिधी म्हणून बैठकीस बसवले. रायगड जिल्हा संघटनेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे असतानाही त्यांना बैठकीसाठी निमंत्रण पाठवले नाही. मात्र त्यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला बसवण्यात आले. महासचिव गोविंद मुथूकुमार यांच्या भावाला हिंगोलीचा प्रतिनिधी म्हणून बैठकीला बसविण्यात आले. चार उपाध्यक्ष निवडण्याचे जाहीर केल्यानंतरही पाच उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

महाजन यांची दुसऱ्यांदा संघटनेच्या अध्यक्षपदी तर कार्याध्यक्ष म्हणून जयदेव श्रॉफ यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी मुथूकुमार निवडून आले असून खजिनदारपदी इब्राहिम लकडावाला यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सतेज पाटील, निखिल लातूरकर, मधुकेश्वर देसाई, एमओ वर्घिस आणि एम. वेंकटेश यांची निवड केली आहे. मात्र या निवडणुकीसाठी राष्ट्रीय महासंघाने निरीक्षक पाठवला नसल्यामुळे या कार्यकारिणीचे व नोंदणी असल्याची अधिकृत कागदपत्रे नसलेल्या महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे पुढे काय होईल, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra basketball association election in controversy
Show comments