बेंगळूरु : नौशाद शेख आणि रोहित मोटवानी यांच्या अर्धशतकांच्या बळावर महाराष्ट्राने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याचा पाच विकेट राखून आरामात पराभव केला. महाराष्ट्राने आठ सामन्यांतून सहा विजयांसह २६ गुण मिळवत अ-गटात दुसरे स्थान मिळवले आहे.

बडोद्याने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २०६ धावा केल्या. करुण पंडय़ाने पाच चौकार आणि एक षटकारासह ५२ धावा काढल्या, तर युसूफ पठाणने ६६ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. महाराष्ट्राच्या समाद फल्लाने २१ धावांत ३ बळी मिळवले.

त्यानंतर महाराष्ट्राची २ बाद १३ अशी अवस्था झाली. परंतु अंकित बावणे (२५) आणि रोहित मोटवानी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. अंकित बाद झाल्यावर रोहितने नौशाद शेखसोबत चौथ्या विकेटसाठी ९० धावांची महत्त्वपूर्ण भागदारी रचली. रोहितने ७८ चेंडूंत सात चौकारांसह ५९ धावा केल्या, तर नौशादने ७७ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७६ धावा काढल्या. बडोद्याच्या अतीथ शेठने ३६ धावांत ३ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

बडोदा : ५० षटकांत ८ बाद २०६ (युसूफ पठाण नाबाद ६४, करुण पंडय़ा ५२; समाद फल्ला ३/२१) पराभूत वि. महाराष्ट्र : ४४.३ षटकांत ५ बाद २०७ (नौशाद शेख नाबाद ७६, रोहित मोटवानी ५९; अतिथ शेठ ३/३६)