अखेरच्या सामन्यात गतविजेत्या कर्नाटकवर विजय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साखळी सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आलेल्या महाराष्ट्राच्या संघाने अखेरच्या सामन्यात मात्र गतविजेत्या कर्नाटकवर ५३ धावांनी विजय मिळवला. महाराष्ट्राने कर्नाटकला विजयासाठी २९३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण निकित धुमाळ आणि अनुपम संकलेचा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने कर्नाटकचा दुसरा डाव २३९ धावांवर संपुष्टात आणत सामना जिंकला. या सामन्यातील विजयामुळे महाराष्ट्राने सहा गुण मिळवले असले तरी यापूर्वीच स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. कर्नाटकला मात्र हा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याची आशा होती, पण पराभवामुळे त्यांना एकही गुण मिळवता आला नाही.
गुरुवारच्या १ बाद ६१ धावसंख्येवरून पुढे खेळताना कर्नाटक हा सामना जिंकेल असे वाटत होते. रॉबिन उथप्पाने ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६१ धावांची खेळीही साकारली, पण तो एकीकडून धावा करत असताना कर्नाटकच्या संघाची पडझड सुरू होती. तो बाद झाल्यावर संघाची ६ बाद १४६ अशी अवस्था होती. पण त्यानंतर कर्नाटकचा अनुभवी फलंदाज सी. एम. गौतमने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. गौतमने अखेपर्यंत किल्ला लढवत ७ चौकारांसह नाबाद ६५ धावांची खेळी साकारली, पण त्यांना दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न लाभल्याने कर्नाटकला पराभव स्वीकारावा लागला.
महाराष्ट्राकडून धुमाळने भेदक मारा करत पाच बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. धुमाळला या वेळी संकलेचाने चार बळी मिळवत सुयोग्य साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : २१२
कर्नाटक (पहिला डाव) : १८०
महाराष्ट्र (दुसरा डाव) : २६०
कर्नाटक (दुसरा डाव) : ७२ षटकांत सर्व बाद २३९ (सी.एम. गौतम नाबाद ६५, रॉबिन उथप्पा ६१; निकित धुमाळ ५/ ७८, अनुपम संकलेचा ४/ ६५).
विदर्भाची भरारी
सात सामन्यांनंतर विदर्भ पाचव्या स्थानावर होता, मात्र अखेरच्या सामन्यात हरयाणावर डावाने विजय मिळवत त्यांनी गुणतालिकेत २९ गुणांसह अव्वल स्थानावर भरारी मारली. गतविजेत्या कर्नाटकला मात्र यावेळी उपांत्यपूर्व फेरीही गाठता आली नाही. अखेरचा सामना वगळता महाराष्ट्राची साखळीमध्ये ढिसाळ कामगिरी झाली. या गटात विदर्भासह बंगाल (२८) आणि आसाम (२६) हे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

मुंबईच अव्वल; गुजरातच बाद
साखळी सामन्यांमध्ये मुंबईने चांगल्या कामगिरीच्या जोरावर या सामन्यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने तीन गुण कमावत एकूण ३५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. गुजरातला या सामन्यात एक गुण मिळाला आणि त्यांची सरासरीही कमी असल्याने ते या स्पर्धेतून बाद झाले. मुंबईसह पंजाब (२६) आणि मध्य प्रदेश (२४) उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

सौराष्ट्र, झारखंड बाद फेरीत
सौराष्ट्राच्या संघाने आठ सामन्यांनंतर ३६ गुणांसह अव्वल स्थान कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सौराष्ट्रने आठ सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. अन्य दोन सामने अनिर्णित राहिले होते. या गटातून झारखंड हा दुसरा संघ ३१ गुणांसह उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. हिमाचल प्रदेशची सरासरी उत्तम असूनही त्यांना एका गुणामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचता आले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra beat karnataka in ranji
Show comments