जयंत यादव याने आठव्या क्रमांकावर खेळताना झुंजार अर्धशतक टोलवूनही हरयाणाचा पहिला डाव २५७ धावांमध्ये गुंडाळण्यात महाराष्ट्रास शुक्रवारी पहिल्या दिवशी यश आले. या दोन संघांमधील रणजी क्रिकेट सामन्यास गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर सुरुवात झाली.
हरयाणाचा कर्णधार अमित मिश्रा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याचा हा निर्णय अंगलटी आला. विशेषत: त्यांचा निम्मा संघ केवळ १०७ धावांमध्ये तंबूत परतल्यावर हा निर्णय त्यांच्यासाठी क्लेषदायकच ठरला. मात्र यथार्थ तोमर (४८), अमित मिश्रा (३५), जयंत यादव (६३) व मोहित शर्मा यांनी शेवटच्या फळीत शानदार फलंदाजी करीत संघास अडीचशे धावांपलीकडे नेण्यात यश मिळविले. महाराष्ट्राकडून श्रीकांत मुंढे व अनुपम सकलेचा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. हरयाणाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी नितीन सैनी (२) व सनीसिंग (०) यांच्या विकेट्स केवळ आठ धावांमध्ये गमावल्या. अभिमन्यु खोड (१७) व राहुल दलाल (५) यांनीही पहिल्या फळीत निराशा केली. एका बाजूने झुंज देणारा सलामीवीर राहुल देवन (४५) हा बाद झाल्यानंतर त्यांची ५ बाद १०७ अशी स्थिती होती. राहुल याने सहा चौकार मारले. त्यानंतर हरयाणाकडून मोठी भागीदारी झाली नाही, तरी त्यांच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांनी आकर्षक फटकेबाजी करीत संघास समाधानकारक धावसंख्या रचण्यात यश मिळवून दिले. तोमर याने नऊ चौकारांसह ४८ धावा केल्या तर मिश्रा याने पाच चौकारांसह ३५ धावा केल्या. जयंत यादवने आत्मविश्वासाने खेळ करीत ६३ धावा केल्या. त्यामध्ये त्याने एक षटकार व आठ चौकार अशी फटकेबाजी केली. मुंढे याने त्यास बाद करीत हरयाणाचा पहिला डाव ८५.२ षटकांत संपुष्टात आणला. त्यानंतर खेळ झाला नाही.
महाराष्ट्राकडून समाद फल्लाह (२/७०), श्रीकांत मुंढे (३/६१) व अनुपम सकलेचा (३/३८) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

Story img Loader