मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा आता मध्यावर आली असून सातपैकी चार साखळी सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे सेनादलाविरुद्ध विजय निसटल्याची खंत निश्चितच आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेतील स्थान भक्कम करण्याची आम्हाला संधी होती. मात्र, आता निराशाजनक पराभव पत्करावा लागल्याने आमचा बाद फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. आम्हाला उर्वरित तीन सामने जिंकण्यावाचून पर्याय नाही, असे मत महाराष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गहुंजे येथे झालेल्या सामन्यात महाराष्ट्राला सेनादलकडून ३५ धावांनी हार पत्करावी लागली. आव्हानात्मक खेळपट्टीवर ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राकडून अंकित बावणेने (नाबाद ९४) कर्णधाराला साजेशी खेळी केली. मात्र, दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत राहिल्याने महाराष्ट्राचा डाव ३०३ धावांत आटोपला. यंदाच्या हंगामात महाराष्ट्राचा हा दुसरा पराभव ठरला. एकीकडे महाराष्ट्राचा संघ पराभूत झाला, तर दुसरीकडे मुंबई आणि जम्मू-काश्मीर या संघांनी विजय साकारले. तसेच बडोद्याने आपला सामना अनिर्णित राखला. त्यामुळे एलिट ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत महाराष्ट्राची (८ गुण) सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

‘‘आमच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. आम्हाला विजयाचे सहा गुण मिळवता आले असते, तर गुणतालिकेत आम्ही आणखी चांगल्या स्थितीत पोहोचू शकलो असतो. खेळाडूंचा आत्मविश्वासही खूप उंचावला असता. त्यामुळे विजय आमच्या हातून निसटल्याची खंत आहे,’’ असे मुंबईचे माजी रणजीपटू असणारे कुलकर्णी म्हणाले.

हेही वाचा >>>Sanju Samson : ‘तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो…’, संजू सॅमसनच्या शतकी खेळीनंतर पत्नी चारुलताच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष

अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला २८७ धावांची गरज होती आणि सात गडी शिल्लक होते. आपला संघ विजयी लक्ष्य गाठू शकेल असा प्रशिक्षकांना विश्वास होता. ‘‘सेनादलाकडून डावखुरा फिरकीपटू अमित शुक्ला (पदार्पणात ११ बळी) चांगली गोलंदाजी करत होता. अन्य गोलंदाजांना आम्ही उत्तम पद्धतीने खेळत होतो. त्यामुळे आम्ही आवश्यक धावा करू शकतो असा विश्वास मला होता. आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी अप्रतिम खेळी केल्या. बावणे आणि सत्यजीत बच्छाव यांच्यात सातव्या गड्यासाठी ९९ धावांची, तर बावणे आणि सौरभ नवले यांच्यात आठव्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी झाली. अशा एक-दोन भागीदाऱ्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांमध्ये झाल्या असत्या, तर विजय आमचाच होता. मात्र, एकंदरीत आम्ही जसा खेळ केला त्याचा मला अभिमान आहे,’’ असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

अनुभवाची कमतरता…

महाराष्ट्राच्या संघाला सध्या अनुभवाची कमतरता जाणवत असल्याचे मत प्रशिक्षक कुलकर्णी यांनी मांडले. महाराष्ट्राचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड सध्या भारत ‘अ’ संघाबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. ‘‘आमच्या संघातील बरेचसे खेळाडू युवा आहेत. केवळ अंकित बावणेच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला अनुभवाची कमतरता निश्चितपणे जाणवली. ऋतुराज हा आमचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्याविना खेळावे लागणे हे आव्हानात्मक होते. मात्र, आमच्या खेळाडूंनी दिलेली झुंज वाखाणण्याजोगी होती. विशेषत: बावणेचे कौतुक. मी पाहिलेली त्याची ही सर्वोत्तम खेळी होती,’’ असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra coach sulakshan kulkarni regretted the loss of victory sports news amy