आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाकडून चमक दाखवण्याची क्षमता लाभलेले क्रिकेटपटू महाराष्ट्राच्या मातीत मोठय़ा प्रमाणात तयार झाले आहेत. मात्र या खेळाडूंच्या मागे महाराष्ट्राचा शिक्का असल्यामुळे भारतीय संघात वर्णी लागण्यासाठी त्यांची चमकदार कामगिरी हवेतच विरून जाते. दुर्दैवाने अशा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आवश्यक असणारा कोणीही ‘कर्ता-करविता’ नाही. त्यामुळेच की काय महाराष्ट्रीय खेळाडूंकडे वलय असूनही कुजलेच गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणजी किंवा तत्सम प्रथम श्रेणीचे सामने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रंगीत तालीमच मानले जातात. महाराष्ट्राने रणजी स्पर्धेत १९३९-४० व १९४०-४१मध्ये अजिंक्यपद मिळवले होते. त्यानंतर एकदाही महाराष्ट्राला या स्पर्धेत अजिंक्यपद नोंदवता आलेले नाही. अगदी अलीकडे २०१३-१४च्या मोसमात महाराष्ट्राने अनेक बलाढय़ संघांवर मात करीत अंतिम फेरीपर्यंत मजल गाठली होती. त्या वेळी विजेतेपदाची महाराष्ट्राला संधी होती, मात्र ही संधी त्यांना साकार करता आली नाही.

महाराष्ट्राचे खेळाडू भारतीय संघाबाबत उपेक्षित राहण्याची दीर्घकालीन परंपरा आहे. हेमंत कानिटकर, पांडुरंग साळगांवकर, सुरेंद्र भावे यांची केवळ एक-दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बोळवण करण्यात आली. साळगांवकर हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम द्रुतगती गोलंदाजांमधील एक गोलंदाज मानले जातात. श्रीलंकेतील मैदानावर झालेल्या दोन कसोटींमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी करूनही त्यांना नंतर भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले नाही. या मालिकेनंतर भारताने इंग्लंडचा दौरा केला होता. मात्र त्यासाठी साळगांवकर यांना संधी मिळाली नव्हती. भारताने या दौऱ्यात केवळ फिरकी माऱ्यावर भर दिला होता. तेथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी साळगांवकर यांना संधी दिली असती, तर त्यांनी इंग्लंडमधील मैदाने गाजवली असती, अशी टीकाही केली होती.

चेतन चौहान हे भारतीय संघातील अव्वल दर्जाचे सलामीवीर होते. महाराष्ट्राकडून खेळत असताना सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्यांची उपेक्षाच झाली होती. मात्र महाराष्ट्राला रामराम ठोकून ते जेव्हा दिल्लीकडून खेळायला लागले, तेव्हा लगेचच त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले व सुनील गावसकर यांच्यासोबत अनेक दिमाखदार भागीदारी रचल्या. राजू भालेकर, मिलिंद गुंजाळ, रियाज पूनावाला, सुनील गुदगे, इक्बाल सिद्दिकी, अभिजित काळे, संतोष जेधे, शंतनु सुगवेकर, अझिम खान, श्रीकांत कल्याणी आदी अनेक खेळाडूंनी रणजी, दुलीप चषक, देवधर करंडक आदी प्रथम दर्जाच्या स्पर्धामध्ये प्रभावी व सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मात्र हे खेळाडू महाराष्ट्राचे असल्यामुळे त्यांच्याकडे अपेक्षेइतके लक्ष गेले नाही. महाराष्ट्राऐवजी कल्याणीने बंगालकडून खेळून पाहिले. मात्र तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.

राष्ट्रीय निवड समितीत काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या वरिष्ठ खेळाडूंना मिळाली आहे. साधारणपणे या सदस्यांनी महाराष्ट्राच्या गुणवान खेळाडूला संधी मिळावी, यासाठी वजन खर्ची केले पाहिजे, अशी अपेक्षा असते. कारण अन्य सदस्य आपला खेळाडू भारतीय संघात कसे स्थान मिळवील यावर भर देत असतात. कल्याणी, पूनावाला, गुंजाळ आदी खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या उंबरठय़ावर असताना निवड समितीमधील महाराष्ट्रीय माणसाने आपले वजन खर्ची केले असते, तर या खेळाडूंना भारतीय संघात निश्चित स्थान मिळाले असते. झहीर खान व इरफान खान हे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, मात्र महाराष्ट्राकडून खेळणे म्हणजे राष्ट्रीय संघापासून दूर राहावे लागेल हे ओळखूनच त्यांनी बडोद्याकडून खेळण्यास प्राधान्य दिले. झहीरने तर मुंबईचेसुद्धा प्रतिनिधित्व केले.

केदार जाधवने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली आहे. त्याला आयपीएल स्पर्धामध्येही भरपूर संधी मिळाली आहे. त्याच्यासारखी चमक दाखवण्याची क्षमता हर्षद खडीवाले, राहुल त्रिपाठी, स्वप्निल गुगळे, अंकित बावणे आदी महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंमध्ये आहे. मात्र महाराष्ट्राचा शिक्का त्यांच्या कपाळावर असल्यामुळे भारतीय संघाबरोबरच आयपीएल स्पर्धेतही हे खेळाडू उपेक्षित राहिले आहेत.

अलीकडेच ‘एका राज्य, एक संघ’ असावा, असे लोढा समितीने सुचवले आहे. जर ही सूचना अमलात आणली गेली, तर महाराष्ट्राच्या खेळाडूंची खूपच पंचाईत होणार आहे. कारण मुंबई, महाराष्ट्र व विदर्भ या तीन संघांचा एकत्रित संघ राज्याचे प्रतिनिधित्व करू शकेल.

महाराष्ट्राच्या अनेक संघटकांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस आदी विविध पदांवर काम केले आहे आणि करीतही आहेत. भारतीय संघात समावेश करण्याची क्षमता असलेल्या गुणवान खेळाडूंना भारतीय संघाची दारे कशी उघडली जातील, असे या संघटकांनी पाहिले पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रीय खेळाडू पुन्हा उपेक्षितच राहणार आहेत.

 

मिलिंद ढमढेरे

millind.dhamdhere@expressindia.com