पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने बॉक्सिंगमध्ये हरयाणा व मणिपूर यांच्या आव्हानास यशस्वीरीत्या सामोरे जात १७ वर्षांखालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामध्ये देविका घोरपडे, मितिका गुणेले, बिस्वामित्र चोंगथोम, शेखोमसिंग व येईफाबा मितेई हे सुवर्णपदकांचे मानकरी ठरले.
देविकाने ४६ किलो गटात हरयाणाच्या तमन्नावर मात करीत दिवसाची सुरुवात सोनेरी केली. मितालीने ६६ किलो गटात हरयाणाच्या मुस्कानला ४-१ अशा फरकाने पराभूत केले. मुलांच्या ४८ किलो गटात महाराष्ट्राच्या चोंगथोमने मिझोरामच्या जोरामुओनावर ४-१ अशी सहज मात करीत सुवर्णपदक जिंकले. शेखोम सिंगने ५० किलो गटात सुवर्णपदक जिंकताना मिझोरामच्या लाल्दिसांगाचा पराभव केला. पुण्याच्या आकाश गोरखाला आणि लैश्राम सिंगलाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तिरंदाजीत पदकाची संधी
महाराष्ट्राच्या ईशा पवारने १७ वर्षांखालील मुलींच्या विभागात कम्पाऊंड प्रकारात पदकाच्या आशा कायम राखल्या. तिने प्राथमिक फेरीत ६८१ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. मुलांच्या १७ वर्षांखालील कम्पाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या प्रथमेश जावळेने प्राथमिक फेरीत सातवे स्थान घेतले आहे. मुलांच्या २१ वर्षांखालील कपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या सौमित्र घोष व निखिल वासेकर यांनी अनुक्रमे ११वे व १२वे स्थान तर मुलींमध्ये महाराष्ट्राच्या ऋचा देशमुखने १५वे स्थान मिळवले.
टेनिसमध्ये गार्गीचे दुहेरी यश
महाराष्ट्राच्या गार्गी पवारने दुहेरी टेनिस स्पर्धेत सुवर्ण तर एकेरीत कांस्यपदक पटकावले. गार्गीने दुहेरीत प्रेरणा विचारेच्या साथीने १७ वर्षांखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा अरमान भाटिया व ध्रुव सुनीश ही जोडी विजेती ठरली. महाराष्ट्राने या सुवर्णपदकांबरोबरच तीन रौप्य व एक कांस्यपदकाचीही कमाई केली. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादवला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अरमानने ध्रुवच्या साथीने २१ वर्षांखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. त्यांनी नितीन सिन्हा व इशाक इक्बाल या बंगालच्या खेळाडूंचा पराभव केला. बास्केटबॉलमध्ये अपयश महाराष्ट्राला बास्केटबॉलमधील १७ वर्षांखालील मुली व २१ वर्षांखालील मुलांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मुलींच्या १७ वर्षांखालील गटातील उपांत्य फेरीत महाराष्ट्राला पंजाबकडून ८०-७३ असा तर मुलांच्या २१ वर्षांखालील गटात तामिळनाडूने महाराष्ट्राचा ७८-५७ असा पराभव केला. महाराष्ट्राच्या व्हॉलिबॉलपटूंना २१ वर्षांखालील मुलींच्या गटात केरळने २५-१९, २५-१८, २५-२२ असे पराभूत केले.