महाराष्ट्राने ब गटातील उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामिळनाडूचा २-१ असा पराभव करून संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. साखळी गटातील तिन्ही सामने जिंकून महाराष्ट्राने नऊ गुणांसह आगेकूच केली आहे.
याआधी महाराष्ट्राने झारखंडवर ४-१ असा तर गोव्यावर ३-० असा दणदणीत विजय मिळवला होता.
तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राकडून दोन्ही गोल एम. पी. प्रदीपने केले. पहिल्या सत्रात गोलशून्यची कोंडी फोडता आली नाही. त्यानंतर प्रदीपने ७५व्या मिनिटाला पहिला गोल केला. ए. रायगनने ८५व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे तामिळनाडूने सामन्यात बरोबरी सधली. अखेर ८८व्या मिनिटाला दुसऱ्या गोलाची भर घालत महाराष्ट्राने सामन्यात बाजी मारली. २०व्या मिनिटाला तामिळनाडूच्या निर्मल कुमारला लाल कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्यांना दहा जणांसह खेळावे लागले.