फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर उत्तर प्रदेशने रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राला आघाडी मिळविण्याच्या संधीपासून वंचित ठेवले. अनिर्णीत राहिलेल्या या सामन्यात पीयूष चावलाने केलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने पहिल्या डावात ७ बाद ६६९ धावा केल्या.
या सामन्यात पहिल्या डावात आघाडी कोणता संघ मिळविणार याचीच उत्सुकता होती. महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या ६ बाद ७६४ धावांना उत्तर देताना उत्तर प्रदेशने १ बाद २८७ धावांवर पहिला डाव पुढे सुरु केला. अष्टपैलू खेळाडू चावला याने निर्जीव खेळपट्टीवर तडाखेबाज खेळ करीत १५६ धावा केल्या. आयरीश आलमने शैलीदार ७० धावा करीत त्याला चांगली साथ दिली. त्यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळेच सामना अनिर्णीत राहिला. भुवनेश्वरकुमारने आक्रमक अर्धशतक ठोकले व संघाच्या धावसंख्येस हातभार लावला.  महाराष्ट्र व उत्तरप्रदेश यांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
श्रीवास्तव व मोहम्मद कैफ यांनी उत्तर प्रदेशचा पहिला डाव पुढे सुरु केला. मात्र महाराष्ट्राचा द्रुतगती गोलंदाज समाद फल्ला याने एकाच षटकांत कैफ व सुरेश रैना यांना बाद करीत उत्तर प्रदेशला धक्का दिला. श्रीवास्तवने त्यानंतर परविंदरसिंगच्या साथीत ५६ धावांची भर घातली. परविंदरसिंगने सहा चौकारांसह ३५ धावा केल्या. उत्तर प्रदेशची ५ बाद ४०५ अशी स्थिती असताना पहिल्या डावात आघाडी घेण्याची महाराष्ट्रास संधी होती, मात्र चावला व आयरीश आलम यांनी २४ षटकांत १२८ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला.    

Story img Loader