* कल्पना तेंडुलकर यांना जिजामाता पुरस्कार * स्नेहल साळुंखे, सुवर्णा बारटक्के, धनंजय महाडिक, क्षिप्रा जोशी यांना शिवछत्रपती पुरस्कार * स्वप्नाली यादव आणि संजय टकले यांना साहसी पुरस्कार
निवडणुकीचा मोसम जवळ आला की, मतदारांना भुलवण्यासाठी सत्ताधारी असो किंवा विरोधक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असतात, याचाच प्रत्यय महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्कारांच्या वेळीही आला. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या वल्गना करणाऱ्या राज्य सरकारला अखेर तीन वर्षांनी पुरस्कारासाठी मुहूर्त सापडला आणि सोमवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून खेळाडू, संघटक, प्रसारमाध्यमे या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी करावी, यासाठी पाठपुरवठा करत होती, पण गेली तीन वर्षे या साऱ्यांना न जुमानणाऱ्या सरकारने अखेर निवडणुकींच्या काही दिवसांपूर्वी घोषणा करत अनोखी ‘खेळी’ खेळली आहे. या घोषणेमुळे तीन वर्ष अडकून ठेवलेल्या पुरस्कारातून अखेर ‘शिवछत्रपती’ मुक्त झाले, अशी प्रतिक्रीया क्रीडा क्षेत्रात व्यक्त करण्यात येत होती.
या पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने कुस्तीचे ज्येष्ठ संघटक बाळासाहेब लांडगे (२००९-१०), अटल बहादूर सिंग (२०१०-११) आणि ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (२०११-१२) यांना गौरवण्यात आले. वर्षां उपाध्ये, नरेंद्र कुंदर यांच्या अन्य सहा जणांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कल्पना तेंडुलकर यांच्यासह चार जणांचा जिजामाता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
स्नेहल साळुंखे, सुवर्णा बारटक्के, धनंजय महाडिक, क्षिप्रा जोशी यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर स्वप्नाली यादव आणि संजय टकले यांना साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गुरू-शिष्याचा सन्मान
जिम्नॅस्टिक या खेळाला मोलाचे योगदान देणाऱ्या वर्षां उपाध्ये आणि त्यांची शिष्या क्षिप्रा जोशी यांना एकाच वर्षी शिवछत्रपती पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०११-१२ या वर्षांसाठी उपाध्ये यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला, तर याच वर्षांसाठी क्षिप्राला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
पिता-पुत्रांची शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी
श्रीरंग इनामदार आणि शंतनू इनामदार या पिता-पुत्रांच्या जोडीला शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घालण्याचे भाग्य मिळाले आहे. शंतनू याला खो-खोसाठी २००९-१० सालासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला
आहे. यापूर्वी कबड्डीमध्ये जया शेट्टी, त्यांच्या पत्नी छाया शेट्टी आणि त्यांचा मुलगा गोरव शेट्टी यांनाही यापूर्वी छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू अशोक मंकड आणि त्यांचा मुगला हर्ष मंकड यांनाही छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अरूण केदार आणि अनुपमा केदार या दाम्पत्यालाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा