मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक यासह बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून देशाची मान उंचावणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा सोमवारी राज्य सरकारच्या वतीने गौरव करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर उपस्थित होते.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्यपदक मिळवणाऱ्या स्वप्नील कुसाळेला दोन कोटी, तर त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना २० लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. पॅरालिम्पिक स्पर्धेत गोळफेक प्रकारात रौप्यपदक मिळवणाऱ्या सचिन खिलारीला तीन कोटी आणि प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपये पारितोषिक म्हणून देण्यात आले.
त्याच बरोबर हंगेरी येथील बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारताच्या महिला संघातील दिव्या देशमुख आणि पुरुष संघातील विदित गुजराथी यांना प्रत्येकी एक कोटी, तर महिला संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे आणि साहाय्यक प्रशिक्षक संकल्प गुप्ता यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले.
ग्लोबल चेस लीगच्या निमित्ताने विदित आणि कुंटे लंडन येथे असल्याने ते गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारले.
सूरज मांढरे नवे क्रीडा आयुक्त
महाराष्ट्राच्या क्रीडा गुणवत्तेचा गौरव करतानाच युवक सेवा व क्रीडा आयुक्तपदी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांची कोकणचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आल्यामुळे हे पद रिक्त होते. मांढरे सध्या शिक्षण आयुक्तही आहेत.