अनुभवी आणि नव्या खेळाडूंचा अनोखा संगम साधलेल्या महाराष्ट्राने सांगलीतील आकुज ड्रीमलँड, कुपवाड येथे विजयाचा सुवर्णचतुष्कोण साधत क्रीडारसिकांना थक्क केले. शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित केलेल्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत आणि फेडेरेशन चषक स्पध्रेत महाराष्ट्राच्या चारही संघांनी अंतिम विजेतेपद पटकावण्याची किमया साधली. राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेच्या किशोरी गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा ईला पुरस्कार महाराष्ट्राच्या मयूरी मुत्याल हिला तर किशोर गटातील भरत पुरस्कार महाराष्ट्राच्या आशुतोष पवारने पटकावला.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अलाहिदा (जादा) डावापर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात कोल्हापूरचा २५-२२ असा पराभव करून जेतेपदावर नाव कोरले. अलाहिदा डावात प्रथम आक्रमणात महाराष्ट्राने १० गडी बाद केले, त्यात अनुभवी रंजन शेट्टी (४ गडी) व राहुल उईके (३ गडी) यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यानंतरच्या संरक्षणात कोल्हापूरकर महाराष्ट्राचे केवळ ७ गडी बाद करू शकले व महाराष्ट्राने ३ गुणांनी सामना जिंकला. अलाहिदा डावातील संरक्षणात महाराष्ट्राच्या मनोज पवारची ३ मिनिटांची खेळी प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली. महाराष्ट्राच्या रंजन शेट्टी, मनोज पवार, राहुल उईके, मुकेश गोसावी व दीपेश मोरे यांनी शानदार खेळ केला. कोल्हापूरच्या अभिजीत पाटील, नीलेश पाटील व महेश मलागे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा १४-१३ असा १ गुण व ३.३० मि. राखून पराभव केला. विजयी संघाच्या सारिका काळे (१.४० मि. व १.२० मि.), श्वेता गवळी (१.३० मि., २.५० मि. व १ गडी), सुप्रिया गाढवे (१.१० मि. व २ गडी), श्रुती सकपाळ (१.४० मि. व २ गडी), आरती कांबळे (४ गडी) व कविता घाणेकर (१.५० मि. व १ गडी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
महाराष्ट्राच्या किशोर संघाने तेलंगणा संघावर १३-१० अशी मात केली. महाराष्ट्राच्या आशुतोष पवार (१.२० मि., १.४० मि. व १ गडी), काशििलग हिरेकुर्ब (२.२० मि., १.५० मि. व १ गडी), वृषभ वाघ (१.४० मि. व ३ गडी), आकाश कदम (१.२० मि., १.१० मि. व १ गडी) व श्रेयस जाधव (३ गडी) यांनी विजयात महत्त्वाचे योगदान दिले.  महाराष्ट्राच्या किशोरींनी कर्नाटकचा (६-२, १०-२) १६-४ असा १२ गुणांनी धुव्वा उडवला. रेश्मा राठोड (३.४० मि. व २.१० मि.), प्राची कíडले (१.५० मि. व २.२० मि.), ऋतुजा हाके (१.३० मि. नाबाद) व मयूरी मुत्यालने (१.४० मि. नाबाद व ५ गडी) विजयश्री खेचून आणली. कर्नाटकच्या लक्ष्मी (१.३० मि. व १.१० मि.), चित्रा (१.५० मि.) व विनिता (२ मि.) यांनी जोरदार झुंज दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा