शारीरिक तंदुरुस्ती ही महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंची चिंतेची बाब आहे, असे मत थायलंडचे कबड्डी प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांनी व्यक्त केले. भेंडीगिरी यांच्या मार्गदर्शनाखालीच गतवर्षी भारताने महिलांचा पहिलावहिला विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. कोल्हापूरमध्ये सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या पुरुष संघासाठी विशेष स्पर्धापूर्व सराव शिबीर झाले होते. या शिबिरात भेंडीगिरी आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक ई. प्रसाद राव यांचे मार्गदर्शन लाभले. याविषयी रमेश भेंडीगिरी यांच्याशी केलेली बातचीत-
नुकत्याच कोल्हापूरमध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या संघाच्या स्पर्धापूर्व सराव शिबिराविषयी काय सांगाल?
मी २००८-०९मध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघासाठी कोल्हापूरमध्ये अशा प्रकारचे सराव शिबीर घेतले होते. त्या शिबिरात स्नेहल साळुंखे, दीपिका जोसेफ अशा अनेक गुणी खेळाडू होत्या. नुकत्याच पुरुष संघासाठी कोल्हापूरमध्ये झालेल्या शिबिरात आम्ही पहिले चार दिवस तंदुरुस्तीवरच प्राधान्याने भर दिला. त्यानंतर कौशल्याबाबत आम्ही मार्गदर्शन केले. दुखापती, लवचीकपणा आदी गोष्टींबाबतही धडे दिले गेले. त्यानंतर सांघिक डावपेचांकडे आम्ही अखेरीस वळलो. याशिवाय सहा, पाच, चार, तीन, दोन आणि एक खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचे तंत्रही शिकवण्यात आले. याचप्रमाणे एलसीडीवर काही सामन्यांची चित्रणे दाखवून त्यावर चर्चा करण्यात आली.
ई. प्रसाद राव यांचे कशा प्रकारे मार्गदर्शन लाभले?
राव यांनी हे शिबीर कशासाठी आहे, हे सर्वाना पटवून दिले. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व त्यांनी खेळाडूंना विशद केले. याचप्रमाणे महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातील सामने दाखवून त्याबाबत चर्चा आणि मार्गदर्शनही केले.
महाराष्ट्राची कबड्डी आज कुठे आहे?
महाराष्ट्राच्या पुरुषांच्या कबड्डीची स्थिती आपण पाहतोच आहे. त्यांच्याकडे कौशल्य आहे, पण शारीरिक क्षमतेमध्ये ते कमी पडतात. उत्तरेकडील राज्य आणि संघांची मक्तेदारी आपल्याला तिथे सहजपणे दिसून येते. पुरुषांची कबड्डी शारीरिक क्षमतेवर बेतल्याचे सध्या दिसून येते. महिलांमध्ये कौशल्यात्मक कबड्डीचे सध्या वर्चस्व दक्षिणेकडे जाते. परंतु पुरुषांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या महिलांची वाटचाल अधिक समर्थपणे सुरू आहे. रेल्वेच्या संघाचे राष्ट्रीय कबड्डीमधील आतापर्यंतच्या वर्चस्वात महाराष्ट्राच्या मुलींचाच सिंहाचा वाटा आहे. गेल्या वर्षी एका गुणाच्या फरकाने महाराष्ट्राने जेतेपद गमावले होते. परंतु या वेळी अभिलाषा म्हात्रे महाराष्ट्राच्या संघात असेल, याचा फरक मैदानावर नक्की दिसून येईल. डोंबिवली राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेतच महाराष्ट्राने विजेतेपदाचे स्वप्न साकारले असते, प्रशिक्षकामुळे तो सामना आपल्याला नाहक गमवावा लागला होता.
प्रशिक्षण हे भारतात खूपच मर्यादित आहे? परदेशात प्रशिक्षण देताना आणखी कोणते मूलभूत फरक दिसून आले?
परदेशात कबड्डीकडेही गांभीर्याने पाहिले जाते. मैदानावरील प्रशिक्षक, प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी सराव घेणारा सरावतज्ज्ञ (ट्रेनर), तंदुरुस्तीतज्ज्ञ (फिजिओ), मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ अशी मोठी साहाय्यकांची फळी प्रशिक्षणकार्यात समाविष्ट असते. भारतातही या गोष्टींचे महत्त्व आता लक्षात येऊ लागले आहे. ‘साइ’ (भारतीय क्रीडा प्राधिकरण) केंद्रांमध्ये अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. परंतु परदेशात विद्यापीठ पातळीवरसुद्धा ही साहाय्यकांची फळी कार्यरत असते. एकाच प्रशिक्षकाने सर्व करायचे हा फरक सहज अधोरेखित होतो.
भारतात आणि परदेशात तंदुरुस्तीमधील फरक काय सांगाल?
भारतातील कबड्डीपटू खेळातील मैदानी कौशल्याकडे प्राधान्याने पाहतो. मैदानावर जाण्यापूर्वी थोडय़ाशा शारीरिक कसरती करून तो सज्ज होतो. परंतु परदेशी संघ तंदुरुस्तीकडे अधिक गांभीर्याने लक्ष पुरवतात. त्यांना कौशल्याची जोड मिळाली, तर तेसुद्धा प्रगती करतील.
उत्तेजकांपासून कबड्डी किती अंतरावर आहे?
कबड्डी उत्तेजकांपासून दूर असल्याचे चित्र समोर येत आहे. ‘वाडा’ अथवा ‘नाडा’च्या चाचणीमध्ये कबड्डीत उत्तेजक घेतल्याचे प्रकार आढळलेले नाहीत. परंतु आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये उत्तेजकांचा कोणताही वावर नाही, असे म्हणता येणे अवघड आहे. कारण आता उत्तेजक चाचणीतून सहीसलामत सुटू शकणारी उत्तेजकेही उपलब्ध होऊ लागली आहेत.

Story img Loader