आयपीएल हा ट्वेन्टी-२०चा फॉम्र्युला यशस्वी झाल्यानंतर अनेक खेळांनी त्याचे अनुकरण केले. देशातील अव्वल खेळाडूंचा सहभाग असलेली पहिलीवहिली कबड्डी प्रीमियर लीग(केपीएल)सुद्धा दोन वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झोकात झाली. याच धर्तीवर महाराष्ट्र कबड्डी प्रीमियर लीगचे (एमकेपीएल) आयोजन करण्याची योजना कागदावर मांडण्यात आली. परंतु गेली दीड वष्रे ती प्रत्यक्षात मैदानावर येऊ शकली नाही.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आयपीएलवर जोरदार टीका होत आहे. एमकेपीएलच्या आयोजनात अनेक उद्योगपती व राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ही स्पर्धा घेणे उचित ठरणार नसल्यामुळे या स्पध्रेला सध्या विलंब होत आहे. एमकेपीएलला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून होणारा विलंब पाहता मुंबई कबड्डी प्रीमियर लीग ही मुंबई केंद्रित स्पर्धा घेण्यासंदर्भातही एक प्रस्ताव तयार आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी मिळावी याचप्रमाणे कबड्डीपटूंना घसघशीत मानधन आणि इनाम मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र कबड्डी प्रीमियर लीगची योजना आखण्यात आली होती. जानेवारी २०१२मध्ये हा प्रस्ताव मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडे सादर केला. त्यानंतर वर्षभरापूर्वी राज्य कबड्डी असोसिएशनने फिदा कुरेशी, शरद कदम, मनोहर इंदुलकर, विश्वास मोरे, प्रताप शिंदे, गणेश शेट्टी, रमेश देवाडीकर, राम मोहिते, सय्यद अली मुझफ्फर आणि सुनील जाधव आदी मंडळींचा समावेश असलेली एक समिती यासंदर्भात नियुक्त केली. नोव्हेंबर २०१२मध्ये ही स्पर्धा घेण्याचे प्रस्तावित होते. परंतु या साऱ्या घटनाक्रमातसुद्धा ‘एमकेपीएल’चे घोंगडे मात्र भिजतच राहिले.
मॅटवर होणाऱ्या या महत्त्वाकांक्षी स्पध्रेत आठ संघांचा समावेश असेल, तर प्रत्येक संघात १२ खेळाडू, एक प्रशिक्षक आणि एक व्यवस्थापक असेल. प्रत्येकी १० लाख रुपयांना संघ खरेदी करता येईल. याचप्रमाणे विजेत्या संघालासुद्धा १० लाख रुपये रोख आणि चषक प्रदान करण्यात येईल. भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूला ५० हजार रुपये मानधन मिळेल.

‘एमकेपीएल’च्या आराखडय़ाला आम्ही अंतिम स्वरूप देत आहोत. खेळाडू, बक्षिसे यांच्यासंदर्भातील नियमावली अंतिम टप्प्यात आहे. राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच ही स्पर्धा मैदानावर अवतरू शकेल.
– मनोहर इंदुलकर, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह

ं‘एमकेपीएल’ प्रत्यक्षात अवतरल्यास खेळाडूंना चांगला पैसा मिळेल. या संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीने लवकरात लवकरच यावर अभ्यास करून ही योजना मैदानावर आणावी.
– राजेश पाडावे, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य

महाराष्ट्र कबड्डी प्रीमियर लीगचा फॉम्र्युला
फ्रेंचायझी शुल्क
१० लाख रुपये

विजेत्यांना बक्षिसे
विजेता संघ : १० लाख रुपये रोख आणि चषक
उपविजेता संघ : ५ लाख रुपये रोख आणि चषक
उपान्त्य पराभूत संघ : प्रत्येकी २ लाख रुपये रोख आणि चषक

संघबांधणी
पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी आठ संघ
प्रत्येक संघात १२ खेळाडू + एक प्रशिक्षक + एक व्यवस्थापक

खेळाडूला मानधन (प्रत्येकी)
भारताचे प्रतिनिधित्व : २५ हजार रु.
राज्याचे प्रतिनिधित्व : १५ हजार रु.
जिल्ह्याचे किंवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व किंवा कुमार/कुमारी राष्ट्रीय प्रतिनिधित्व : १० हजार रुपये.

Story img Loader