Maharashtra Kesari 2023: ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला.नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनला ८-१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा ६/४ असा पराभव केला होता.
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला आनंद महिंद्रा यांनी ‘थार’ नावाची चारचाकी गाडी भेट दिली. आज तो माझा कट्टावर बोलताना त्याने त्यावर एक मिश्कील टिपण्णी केली. ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारण्यात आला की आता तू गाडी घेऊन कुठे जाणार? यावर त्याने उत्तर दिले की, ” मला तर दुचाकी पण येत नाही आणि माझ्याकडे तर ड्रायव्हिंग लायसन्सपण नाही. त्यामुळे मी आधी गाडी शिकेन आणि मग त्यानंतर लायसन्स काढून गाडी चालवेल.”
त्यावर आणखी त्याला जोडून प्रश्न विचारण्यात आला की, त्यात तू कोणाला शेजारी बसवणार? यावर त्याने मजेशीर उत्तर दिले की, ” सध्या तरी माझा भाऊ गाडी चालवेल. ज्यावेळेस शिकेल त्यावेळेस आधी आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाला देव दर्शन करायला घेऊन जाईन. मी फक्त २६ वर्षाचा असल्याने अजून तरी तसा काही विचार केला नाही. त्यामुळे ती गाडी माझा भाऊ मला कधी शिकवतो आहे याचीच मी वाट बघत आहे.” पुढे त्याने वडिलांनी माझ्यावर खूप कष्ट घेतले. तसेच आतापर्यत माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया देखील झाल्या पण मी कधीच डगमगलो नाही. मला उभारी देण्यात माझ्या कुटुंबाचा यात फार मोठा वाटा आहे.
“तू कोणत्या देवाला नवस केला आहे का? ” यावर त्याने उत्तर देत म्हणाला की, ” मी देवाला नवस केला होता. देवा मला महाराष्ट्र कुस्ती म्हणून विजयी कर मी तुला चांदीची गदा देईन, अशी ज्योतीबाला नवस केला होता आणि मी परवा तो फेडायला जाणार असून जाताना महिंद्राची थार घेऊन जाणार आहे.”