Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe Controversy: अहिल्यानगर येथे २ फेब्रुवारीला प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी २०२५ चा उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना खेळवण्यात आला होता. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळने बाजी मारत मानाची गदा पटकावली. पण अंतिम फेरीदरम्यान त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात मैदान सोडल्याने त्याला विजयी घोषित करण्यात आले. पण तत्पूर्वी शिवराज राक्षेने देखील उपांत्य फेरीच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाविरूद्ध मोठा वाद घातला.

पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील उपांत्य फेरीचा निकाल पंचांनी अवघ्या ४० सेकंदात दिला होता. पण शिवराजने खांदे जमिनीला टेकले नसल्याचे सांगत पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली. पण पंचांनी त्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं. शिवराजसह त्याचे प्रशिक्षक आणि त्याच्या समर्थकांनीही त्याचे खांदे खाली टेकले नव्हते त्यामुळे रिव्ह्यू पाहून निर्णय द्यावा असे सांगितले. शिवराजने पंचांनी विनंती देखील केली, पण पंचांनी काही प्रतिसाद दिला नाही. यानंतर संतापलेल्या शिवराजने पंचांची कॉलर धरली आणि त्यांनी लाथदेखील घातली, ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला.

पंचांबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षेवर तीन वर्षांची निलंबनाची कारवाई केली आहे. यानंतर आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पैलवान चंद्रहार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, “खरंतर काल जे घडलं ते चुकीचं झालं. खरंतर शिवराजच्या बाबतीत जे घडलं त्यामध्ये पृथ्वीराजची चूक नाही आणि शिवराजची देखील चूक नाही. तिथे चूक फक्त त्या मॅटवर असणाऱ्या पंचांची चूक आहे.”

“शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला हाच प्रकार माझ्या बाबतीत तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना घडला. त्यावेळेस मी अनेक गोष्टींचा विचार केला नव्हता. पण याचा विचार न करता शिवराजने पुढे गेलं पाहिजे. शिवराजकडून काही चुका झाल्या, शिवराजने लाथ घातली ही खरंतर चूक झाली, असं मी मीडियाच्या माध्यमातून म्हणालो होतो. पण शिवराजने खरंतर जो पंच होता अशा पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे, कारण शिवराज राक्षेची कुस्ती आज आपण पाहिली तर गेल्.या १५-२० वर्षांची त्याची तपश्चर्या आहे. त्या २० वर्षांच्या तपश्चर्येनंतर तो आता कुठेतरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या गदेपर्यंत पोहोचला होता आणि १० सेकंदात जर तुम्ही त्याचं आयुष्य उद्धवस्त करून टाकताय ते पण एका पंचाच्या चुकीमुळे… खरंतर या पंचांना अशा पद्धतीची शिक्षा जर मिळाली तर भविष्यात कुस्ती क्षेत्रात कुठेतरी पंचांवर वचक बसेल”, असं चंद्रहार पाटील यांनी मोठं वक्तव्य करत शिवराजच्या वागण्याला पाठिंबा दिला.

शिवराज राक्षेच्या बाबतीत हे जे काही घडलंय ते पूर्ण चुकीचं आहे आणि या सगळ्यामध्ये चूक फक्त मॅटवर असणाऱ्या पंचांची आहे, असं स्पष्ट वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलं. स्वत: डबल केसरी असणाऱ्या चंद्रहार पाटील यांच्याबरोबर २००९ च्या कुस्ती स्पर्धेतील अंतिम फेरीत पंचांच्या निर्णयाचा असाच फटका बसला होता. यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे देखील सांगितले. पण चंद्रहार पाटील यांनी शिवराज राक्षेला कोणताही विचार न करता पुढे जात राहण्याचे सांगितले.

Story img Loader