२ फेब्रुवारीला अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळने उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षे आणि अंतिम फेरीत पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावर विजय मात करत मानाची गदा पटकावली. पण या दोन्ही फेरीच्या सामन्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला.

अंतिम सामन्यानंतर पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी आणि गैरवर्तनासाठी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांना कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. उपांत्य फेरी सामन्यात सामन्यात ४० सेकंदात पंचांनी शिवराज राक्षेविरूद्ध पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं.

पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षेने पंचांशी वाद घातला. शिवराजने, त्याच्या प्रशिक्षकांनी व इतर उपस्थितांनी दावा केला की शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेच नव्हते. शिवराजने देखील रिव्ह्यूची मागणी केली. मात्र पचांनी त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. परिणामी शिवराजने गोंधळ घातला. मैदानात धक्काबुक्कीही सुरू झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालू होता. शिवराजने संतापून पंचांना लाथ देखील मारली.

तर अंतिम फेरीतही असाच वाद पाहायला मिळाला. या सामन्यात महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ आमने सामने होते. मात्र हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालायला सुरुवात केली. त्याने पंचांना शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ महेंद्रने थेट मैदान सोडलं. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं. 

पंचांच्या चुकीच्या निर्णयाबाबत आता संघटनेचे पदाधिकारी संदीप भोंडवे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. संदीप भोंडवे म्हणाले, “स्पर्धा संपता संपता मॅटवरील अंतिम फेरीत आणि त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये जे निर्णय पंचांनी दिले ते निर्णय कदाचित शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना मान्य नव्हते आणि त्यांनी कुस्ती झाल्यानंतर पंचांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला पण पंचांवर शिवराजने हात उगारण्याचा निर्णय घेतला आणि मला वाटतं हे निषेधार्थ आहे. प्रत्येक खेळामध्ये खिलाडू वृत्ती असते, आपण पाहतो क्रिकेटमध्ये जर एखादा पंचांनी निर्णय दिला आणि जरी खेळाडूला माहित आहे निर्णय चुकीचा आहे तरी खेळाडूंनी निमुटपणे मान खाली घालून सरळ मैदानाबाहेर जातो. आपल्याला पण रिप्लेमध्ये दिसतं की पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे. परंतु पंचांना तिथे देवाचं स्थान आहे.”

Story img Loader