Maharashtra Kesari Kaka Pawar Statement on Shivraj Rakshe Controversy: महाराष्ट्र केसरी २०२५ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे एकमेकांविरूद्ध भिडले. महाराष्ट्र केसरीच्या पंचांनी अवघ्या ४० सेकंदात पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्याचं घोषित केलं आणि यानंतर कुस्तीच्या मॅटवर मोठा वादंग पाहायला मिळाला. शिवराज राक्षेने पंचांशी हुज्जत घातली. शिवराजने रिव्ह्यू पाहून निर्णय देण्याची मागणी केली पण पंचांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मग त्याने पंचांशी बोलताना त्यांची कॉलर धरली आणि लाथदेखील मारली. यानंतर शिवराज राक्षेवर कुस्तीगीर परिषदेने ३ वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

शिवराज राक्षेच्या या वादावर अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू आणि प्रशिक्षक काका पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे आणि अनेक सवाल विचारले आहेत. महाराष्ट्र केसरी कोण होणार हे स्पर्धेच्या आधीच ठरलं जातं असा गंभीर आरोप काका पवारांनी केला आहे. शिवराज आणि महेंद्र गायकवाड ३ वर्षांची बंदी घातल्यानंतर पंचांना जन्मठेप द्या अशी मागणीदेखील काका पवारांनी केली आहे. पण शिवराजच्या चुकीचं समर्थन करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

कुस्ती प्रशिक्षक काका पवार काय म्हणाले, “मी दोघांचही (पंच आणि शिवराज राक्षे) समर्थन करत नाही. काय झालं हे मला माहितही नाही. पण तुम्ही जर एखाद्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असाल तर माणसाच तोल सुटतोच, कोणाचाही सुटतो. राजकारण्यांचा तोलही जातो आणि मग यांचाही जातोच. हे तर पैलवान आहेत, रोज तुपातलं खाणारे आहेत. ह्यांचा संयम तुटला असेल पण तुम्ही एवढी मोठी शिक्षा (३ वर्ष निलंबन) देणार? मग पंचांना काय करणार जन्मठेप देणार त्यांना तुम्ही?”

दोन्ही संघटनांवर राजकीय प्रभाव आहे त्याबाबत बोलताना म्हणाले, “आजवर कोणी केलेला नाही. ते फक्त पाहायला होते सगळेजण, उगीच कशाला आळ घ्या. अनेकजण होते तिथे तेव्हा शिवराज मुरली अण्णा, अजित दादा यांच्याकडे न्याय मागायला जात होता, पण त्याला जाऊ दिलं नाही. तो रिव्ह्यू बघायला जात होता ते पाहू दिलं नाही, अरे का काही इंटरनॅशनल आहे काय ते? पण उपस्थित राजकारण्यांनी तिथे प्रश्न विचारायला हवे होते की काय झालं रिव्ह्यू बघा का नकार देताय असं…”

कोणत्या पैलवानाला यावेळेस महाराष्ट्र केसरी करायचं हे ठरतं का आधी? यावर काका पवार म्हणाले, “हो ठरतं ना त्यांच्यात, ठरलं म्हणून तर झालं हे… पैलवान मॅचफिक्सिंग नाही करत पण संघटनेचं असतं ना पंचावर दबाव टाकणे, पुढचं नीट करणे, तू हे नीट कर आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. असं करून चालेल का? मग तुमचे पैलवान ऑलिम्पिकला जातील का? तुम्ही इथेच पैलवानकी संपवत राहिलात तर पुढे कसे जाणार?”

Story img Loader