सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याने कुस्ती क्षेत्रात दुहेरी महाराष्ट्र केसरी असा लौकिक असलेले पैलवान लक्ष्मण श्रीपती वडार यांचे शनिवारी सकाळी केर्ले (ता. करवीर) येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
 राष्ट्रीय तालीम संघ व बाळासाहेब गायकवाड यांनी त्यांचे कुस्तीवरील प्रेम व गरिबीची स्थिती लक्षात घेऊन दरमहा ४५० रुपयांचे मानधन सुरू केले. याच मदतीमुळे कुस्ती क्षेत्रात वडार यांनी अनेक मैदाने गाजविली.  कर्मभूमी कोल्हापुरात १९७२ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी मोहनसिंग बिसेना यांना अस्मान दाखविले. विजयाची हीच परंपरा पुढे सुरू ठेवत त्यांनी १९७३ साली अकोला येथे रघुनाथ पवार यांना पराभूत केले.