राज्यात मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केशरीचा खिताब कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील याने पटकावला आहे. शनिवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या विशाल बनकरला नमवत पृथ्वीराजने ही कामगिरी केलीय. हा खिताब जिंकल्यानंतर पृथ्वीराजचा भव्य सत्कार करण्यात आला. मात्र कुस्तीच्या आयोजकावर पृथ्वीराजने नाराजी व्यक्त केली आहे. आयोजकांनी गदा आणि पदकाव्यतीरिक्त कोणतंही बक्षीस दिलेलं नसल्याचं पृथ्वीराज पाटीलने म्हटलंय.

हेही वाचा >>> बंगळुरुचा सात गडी राखून दणदणीत विजय, मुंबईचा सलग चौथा पराभव

टीव्ही ९ मराठीने याबाबत सविस्तर वृत्त दिलेलं आहे. “मी लहानपणापासून तालमीत आहे. मला आयोजकांकडून अजून बक्षीस मिळालेले नाही. दरवर्षी होणाऱ्या स्पर्धांमध्ये जो महाराष्ट्र केशरी होतो, त्याला काहीतरी बक्षीस मिळतेच. पैसै किंवा गाडी असं काहीतरी मिळतं. पण यावेळी आयोजकांनी काही दिलेलं नाही. मेडल आणि गदा दिलेली आहे. पण आर्थिक मदत केलेली नाही. मला अजून कोणीही बोलावलेलं नाही,” अंस म्हणत पृथ्वीराजने आयोजकांवरील नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> IPL 2022, RCB vs MI : मुंबईचा सूर्यकुमार तळपला, चाहते म्हणतात ‘एकच वादा सूर्या दादा,’ मैदानातील पोस्टर्स व्हायरल

दरम्यान, शनिवारी महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील (वय २०) आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात शनिवारी अटीतटीची लढत झाली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत ५-४ असा विजय मिळवला आणि ४५ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणे गावचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. मग मोतीबाग तालमीतून कुस्तीचा प्रशिक्षणाला प्रारंभ केला. भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून त्याने कुस्तीचे धडे घेतलेले आहेत.