पुण्याच्या सचिन येलभरवर मात करत ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळविल्यामुळे चाळीसगावच्या विजय चौधरीचा गवगवा सर्वत्र झाला असला तरी आजपर्यंत अनेक कुस्त्यांचे फड गाजवूनही कोणतीही दखल राज्य शासनाकडून घेण्यात आली नसल्याचे शल्य विजयला बोचत आहे. आता तरी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविल्यानंतर तरी शासन आपल्याकडे लक्ष देईल, अशी त्याला अपेक्षा आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे विजयचे गाव. वडील नथ्थू चौधरी हे पंचक्रोशीत ‘नथ्थू पहिलवान’ म्हणून प्रसिद्ध. गावातील व्यायामशाळेत कुस्तीचे धडे देणाऱ्या वडिलांच्या तालमीतच विजयने लहानपणी कुस्तीचे डावपेच गिरवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कुस्तीतील त्याचे गुरूही ज्ञानेश्वर लांडगे, अमोल बुचडे याप्रमाणे बदलत गेले. चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालयात पदवीपर्यंत आणि त्यानंतर पुणे येथे कला शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विजयला तीन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. तीन ते चार वर्षांपासून तो पुण्यातच शैक्षणिक आणि कुस्तीचे अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण घेत आहे.
 आतापर्यंत चांदीच्या लहान-मोठय़ा अशा १६ गदा मिळविणाऱ्या विजयने पंजाबमधील गावोगावींच्या स्पर्धामध्ये मिळवले आहेत. त्याच्या उल्लेखनीय बहुमानांमध्ये महाराष्ट््रर महाबली बहुमान (२००८), उत्तर महाराष्ट्र केसरी, नाशिक (२०१०), खान्देश केसरी (२०१०) यांचा समावेश करावा लागेल. राज्य शासनाने आपल्या कामगिरीची दखल घ्यावी, यासाठी त्याने माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे, परंतु अजूनपर्यंत त्याच्या प्रयत्नांना कोणतेही यश आलेले नाही.

Story img Loader