महाराष्ट्राच्या खो-खो संघाचे प्रशिक्षक महेश पालांडे यांची भावना
मुंबई : दोन वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या महिला संघात सांघिक कामगिरीचा अभाव आढळला. यंदा मात्र सर्वानी एकत्रित मिळून खेळ उंचावल्याने महाराष्ट्राने जेतेपद मिळवले, असे मत महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रशिक्षक महेश पालांडे यांनी व्यक्त केले.
जबलपूर (मध्य प्रदेश) येथे डिसेंबरमध्ये झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला नमवून २३व्यांदा अजिंक्यपद पटकावले. तसेच २०१९मध्ये छत्तीसगडला झालेल्या पराभवाचा वचपा काढला. ‘‘महाराष्ट्राच्या कामगिरीचा तुम्ही आढावा घेतल्यास कोणत्याही एका खेळाडूच्या बळावर आम्ही हे जेतेपद मिळवलेले नाही, हे दिसून येते. प्राधिकरणातील खेळाडू उत्तम आहेत, यात शंका नाही. परंतु यावेळी आमची सांघिक कामगिरी अधिक उजवी ठरली,’’ असे पालांडे म्हणाले.
‘‘गतवेळेस नवे खेळाडू संघातील अनुभवी खेळाडूंशी मोकळेपणाने संवाद साधताना संकोच बाळगत होते, असे वाटले. परंतु यंदा तसे काहीही दिसले नाही. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत या सर्व खेळाडूंचा खेळ मी जवळून पाहिला आणि त्यावेळीच यंदा आपण प्राधिकरणाला नमवणार, याची खात्री पटली. त्यांच्याविरुद्ध डाव्या आक्रमणाची चाल यशस्वी ठरली,’’ असेही पालांडे यांनी नमूद केले. दरम्यान, खो-खोमध्ये दर तीन वर्षांनी प्रशिक्षक बदलण्याची प्रथा आहे. पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने दोनदा जेतेपद मिळवले. त्यामुळे पुन्हा प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली, तर तुम्ही तयार असाल का, या प्रश्नावर अद्याप विचार केलेला नाही, असे पालांडे यांनी उत्तर दिले. याशिवाय रेल्वेचा महिलांचा संघ सुरू झाला तर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी व्यावसायिकदृष्टय़ा नक्कीच उत्तम होईल. परंतु महाराष्ट्राला रेल्वे आणि प्राधिकरणाच्या तोडीचा संघ तयार करण्यासाठी आतापेक्षा अधिक परिश्रम घ्यावे लागतील, याकडेही पालांडे यांनी लक्ष वेधले.