अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र व कोल्हापूर यांनी पुरुष व महिला या दोन्ही गटांमध्ये बाद फेरीत स्थान मिळवीत वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले. याचप्रमाणे केरळ, रेल्वे, आंध्र प्रदेश, दिल्ली यांनीही बाद फेरी निश्चित केली. विद्या प्रतिष्ठान क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुष व महिला गटात महाराष्ट्राला पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघ न आल्यामुळे पुढे चाल मिळाली होती, त्यामुळेच सोमवारी प्रथमच महाराष्ट्राच्या खेळाडूंना येथे आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राने पुरुष गटात तामिळनाडू संघाचा १७-३ असा एक डाव आणि १४ गुणांनी पराभव केला तर महिलांमध्ये महाराष्ट्राने चंडिगढचा २०-० असा धुव्वा उडविला.
पुरुष गटातील एकतर्फी लढतीत महाराष्ट्राने तामिळनाडूवर डावाने मात केली. नरेश सावंत (नाबाद २ मिनिटे १० सेकंद व ४ गडी), अक्षय निंबरे (४ मिनिटे ४० सेकंद), तक्षक गौंडाजे (४ मिनिटे २० सेकंद) प्रतीक वाईकर (३ मिनिटे १० सेकंद), तेजस शिरसकर (३ मिनिटे ४० सेकंद), युवराज जाधव (३ गडी) हे चमकले. रेल्वे संघाने गोवा संघावर २३-१२ अशी एक डाव ११ गुणांनी मात केली. विजयी संघाकडून कुणाल वाईकर (एक मिनीट ४० सेकंद व ८ गडी), अमोल जाधव (२ मिनिटे ४० सेकंद व तीन गडी), नचिकेत जाधव (४ गडी) यांचा खेळ उल्लेखनीय झाला. उत्तर प्रदेशने उत्तराखंड संघाचा २६-२ असा एक डाव २४ गुणांनी पराभव केला. ओडिशा संघाने नागालँड संघावर २१-३ अशी एक डाव १८ गुणांनी मात केली.
महिलांमध्ये महाराष्ट्राने चंडिगढ संघाचा २०-० असा दारुण पराभव केला. मध्यंतरालाच चंडिगढने पराभव मान्य करीत सामना सोडून दिला. महाराष्ट्राच्या सारिका काळे हिने नाबाद नऊ मिनिटे पळतीचा खेळ केला. महाराष्ट्राच्या मीनल भोईर, प्राजक्ता कुचेकर यांनी प्रत्येकी चार गडी तर शिल्पा जाधव, श्वेता गवळी, करिश्मा नागरजी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. कोल्हापूरने उत्तरांचल संघावर २६-३ अशी एक डाव आणि २३ गुणांनी मात केली. कोल्हापूर संघात सबज्युनिअर व ज्युनिअर गटातील प्रत्येकी सहा खेळाडू असूनही या संघाचे प्रशिक्षक श्रीकांत उरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध खेळ करीत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे संरक्षण व आक्रमण या दोन्ही आघाडय़ांवरील कौशल्य अतुलनीय होते.
महिला गटातील अन्य लढतींत हिमाचल प्रदेशने मध्य प्रदेश संघावर १२-११ असा निसटता विजय मिळविला. मध्य प्रदेशने दुसऱ्या डावात आठ गडी मारून चांगली लढत दिली. झारखंड संघाने उत्तराखंड संघाला १७-० अशी धूळ चारली.    
  बाद फेरीत प्रवेश करणारे गटवार संघ
पुरुष : ए गट-रेल्वे, दिल्ली. बी गट-महाराष्ट्र, तामिळनाडू. सी गट-आंध्र प्रदेश, विदर्भ. डी गट-
कर्नाटक, पुडुचेरी. ई गट-केरळ, पंजाब. एफ गट-छत्तीसगड, मध्य भारत. जी गट-कोल्हापूर, तेलंगणा. एच गट-पश्चिम बंगाल, हरयाणा.
महिला : ए गट-महाराष्ट्र, तामिळनाडू. बी गट-केरळ, हिमाचल प्रदेश. सी गट-आंध्रप्रदेश, चंडिगढ. डी गट-पुडुचेरी, दिल्ली. ई गट-विदर्भ, तेलंगणा. एफ गट-पंजाब, कोल्हापूर. जी गट-कर्नाटक, मध्य भारत. एच गट-पश्चिम बंगाल, हरयाणा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा