सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत पंजाबच्या गौरव मच्छवाडा याने महाराष्ट्र केसरी हर्षल सदगिर याला हफ्ता डावावर चितपट करत विजय मिळवला. दोन्ही पैलवानांच्यात बराच वेळ खडाखडी सुरू होती. ११ व्या मिनटाला गौरवने कुस्ती जिंकली.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाराष्ट्र कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम, आ. अरुण लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, माजी खासदार संजयकाका पाटील आदी उपस्थित होते. या वेळी आजी-माजी खासदारांमध्ये गप्पांची मैफल चांगलीच रंगली होती.
माऊली जमदाडे विरुद्ध प्रिन्स कोहली यांच्यात झालेल्या कुस्तीत चौथ्या मिनिटाला प्रिन्स कोहलीने माऊलीवरती घिस्सा डावावर विजय मिळवला. महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर यांच्यात झालेल्या कुस्तीत महेंद्र गायकवाड पुट्टी डावावरती दहाव्या मिनिटाला विजयी झाला. दादा शेळके विरुद्ध लल्लू जम्मू यांच्यातील कुस्ती ३० मिनिटांनी गुणावर लावण्यात आली. दादा शेळके आक्रमक झाला आणि दुसऱ्या मिनिटाला तो गुणांवरती विजयी झाला.
यासह, इतर चटकदार कुस्त्यांत रविराज चव्हाण विरुद्ध अभिनव नायक यांच्यातील कुस्ती प्रेक्षणीय झाली. प्रथम अभिनवने छडी टांग करत कुस्तीत रंगत आणली. हा डाव पलटवार करत एकेरी कसावरती चौथ्या मिनिटानंतर रविराज चव्हाणने कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या वर्षी मैदानात निकाली महिला कुस्त्याही झाल्या. नेहा शर्मा विरुद्ध धनश्री फंड यांच्यात कुस्ती झाली. सुरुवातीला नेहाने मोळी बांधण्याचा प्रयत्न केला; पण आठ मिनिटांच्या खडाखडीनंतर कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. मुस्कान रोहतक विरुद्ध पूजा लोंढे यांच्यात कुस्ती झाली. यामध्ये एकेरी कसावरती अवघ्या दुसऱ्या मिनिटाला मुस्कान रोहतक विजयी झाली. वेदान्तिका पवार विरुद्ध दिशा मलिक यांच्यात कुस्ती झाली; पण ती बरोबरीत सोडवण्यात आली. वैष्णवी पवार विरुद्ध रिया भोसले यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये भोसलेने पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवला.