मुंबई : महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा महोत्सवात महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षांखालील मुला-मुलींनी सोमवारी चमकदार कामगिरी करीत पदकांची आघाडी कायम राखली. ५९ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५९ कांस्यपदकांसह एकूण १६६ पदकांची कमाई करीत महाराष्ट्राने अग्रस्थान टिकवले आहे.

जलतरणात केनिशा, अपेक्षाचे सोनेरी यश

महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नाडिस यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. रौप्यपदक मिळवणाऱ्या खेळांडूमध्ये महाराष्ट्राच्या आकांक्षा बुचडे, रुद्राक्ष मिश्रा, शेरॉन साजू यांचा समावेश आहे, तर साहिल पवार, साध्वी धुरी यांनी कांस्यपदक मिळवले. अपेक्षाने १७ वर्षांखालील मुलींच्या २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीचे सुवर्णपदक मिळवताना हे अंतर २ मिनिटे २७.५४ सेकंदात पार केले. याच वयोगटातील ५० मीटर्स फ्रीस्टाइल शर्यत केनिशाने २७.२८ सेकंदांत जिंकली. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात आकांक्षा बुचडेला २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर २ मिनिटे ३८.१३ सेकंदांत पूर्ण केले. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात रुद्राक्षने ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना २५.०७ सेकंद वेळ नोंदवली. मुलांच्या २१ वर्षांखालील ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत साहिल पवारने २४.५३ सेकंद वेळ नोंदवली. त्याने गोव्याच्या जेरी डिमेलोच्या साथीने संयुक्तपणे कांस्यपदक मिळवले. मुलांच्या २१ वर्षांखालील १५०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसेने रौप्यपदक पटकावले.

कबड्डीमध्ये संमिश्र यश

महाराष्ट्राला कबड्डीमधील मुलींच्या विभागात संमिश्र यश मिळाले. २१ वर्षांखालील मुलींमध्ये महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा ३३-२७ असा पराभव केला, तर १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राला उत्तर प्रदेशकडून ३०-३१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. बंगालविरुद्ध महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी, सृष्टी चाळके व आसावरी कचरे यांनी जिद्दीने खेळ केला. पूर्वार्ध संपण्यास ३० सेकंद बाकी असताना सोनालीने लोण नोंदवण्याच्या दोन गुणांसह चार गुण मिळवत महाराष्ट्राला निर्णायक आघाडी घेतली. हीच आघाडी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली. उत्तर प्रदेशविरुद्ध सामन्यात शेवटचे एक मिनिट बाकी असताना उत्तर प्रदेशकडे ३०-२८ अशी आघाडी होती. महाराष्ट्राने दोन गुण नोंदवत ३०-३० अशी बरोबरी साधली. सामना संपल्याची शिट्टी वाजल्यानंतर पंचांनी उत्तर प्रदेशला एक तांत्रिक गुण दिला. त्यामुळे त्यांचा संघ विजयी झाला.

बॉक्सिंगमध्ये आकाश व मितिकाचा विजयी प्रारंभ

महाराष्ट्राच्या आकाश गोरखा, मितिका गुणेले, संगीता रुमाले यांनी बॉक्सिंगमध्ये विजयी वाटचाल राखली. आकाशने १७ वर्षांखालील गटातील फीदरवेट विभागात मणिपूरच्या लायशानग्बम सिंग याच्यावर ४-१ अशी मात केली. मुलींच्या लाइटवेट गटात महाराष्ट्राच्या सना गोन्साल्विसने आव्हान राखले.

खो-खोमध्ये विजयी घोडदौड

महाराष्ट्राने २१ वर्षांखालील मुले व मुली तसेच १७ वर्षांखालील मुले व मुली या वयोगटात खो-खोमध्ये बाद फेरीसाठी आव्हान राखले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने संकेत कदम व अरुण गुणके यांच्या खेळाच्या बळावर विजय मिळवला. मुलींमध्ये महाराष्ट्राने दिल्लीचा १२-७ असा पराभव केला. त्याचे श्रेय निकिता पवार, प्रियंका भोपी आणि अपेक्षा सुतार यांना जाते. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने दिल्लीचा १४-९ असा पराभव केला. महाराष्ट्राकडून दिलीप खांडवी, हृषीकेश जोशी, रोहन कोरे चमकले. मुलींमध्ये महाराष्ट्राने तमिळनाडूला १३-९ असे नमवले. महाराष्ट्राकडून सृष्टी शिंदे, किरण शिंदे आणि रितिका मगदूग यांनी सुरेख कामगिरी केली.

Story img Loader