रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

आतापर्यंतच्या रणजी सामन्यांमध्ये फारसे यश न मिळालेल्या महाराष्ट्राला बाद फेरीत स्थान मिळविण्याकरिता हरयाणाविरुद्ध होणाऱ्या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. या सामन्याला शनिवारपासून गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर प्रारंभ होत आहे.
महाराष्ट्राने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये केवळ तीन गुणांची कमाई केली आहे. घरच्या खेळपट्टीवर होणाऱ्या या सामन्यात अनुकूल वातावरणाचा फायदाही मिळण्याची शक्यता आहे. मात्र अमित मिश्रा या अनुभवी खेळाडूच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या हरयाणा संघाने महाराष्ट्रापुढे आव्हान निर्माण केले आहे. पुण्यात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांच्यात झालेल्या रणजी सामन्यात दोन्ही संघांनी मिळून चार दिवसात दीड हजार पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याचप्रकारची खेळपट्टी या सामन्यासाठी राहणार नाही, मात्र गोलंदाज व फलंदाज यांना पोषक अशी खेळपट्टी तयार करण्यात आली आहे.
सातत्यपूर्ण कामगिरी व सांघिक कौशल्याचा अभाव हीच महाराष्ट्रापुढील खरी समस्या आहे. केदार जाधव, विराग आवटे, रोहित मोटवानी, हर्षद खडीवाले, अंकित बावणे यांनी फलंदाजीत चमक दाखविली असली तरी त्यांची ही कामगिरी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली आहे. गोलंदाजीतही समाद फल्ला, श्रीकांत मुंढे व चिराग खुराणा यांना मर्यादित यश लाभले आहे. महाराष्ट्राने या लढतीसाठी राहुल त्रिपाठी, प्रयाग भाटी व निकित धुमाळ या तीन युवा खेळाडूंना पाचारण केले आहे.
हरयाणाने बलाढय़ दिल्लीवर मात केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. अमित मिश्राला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असल्याचा फायदा हरयाणाला होणार आहे. पाहुण्या संघाच्या फलंदाजीची मदार राहुल देवन, नितीन सैनी, सचिन राणा, यजुर्वेद चहाल यांच्यावर आहे.    

Story img Loader