अनुपम संकलेचा – महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज

आपल्या देशात कोणताही खेळाडू जेव्हा खेळामध्ये कारकीर्द घडवण्याचा विचार करतो, त्या वेळी त्याचे एकच मुख्य ध्येय असते ते म्हणजे देशासाठी खेळायचे. माझेही हेच स्वप्न असून, या मोसमातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर लवकरच भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवेन, असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज अनुपम संकलेचाने ‘दै. लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे. अनुपमने यंदाच्या रणजी स्पर्धेत विदर्भविरुद्धच्या सामन्यात १४ फलंदाज, तर आसामविरुद्ध १२ बळी बाद करीत महाराष्ट्रास निर्णायक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. ३४ वर्षीय अनुपमने प्रथम दर्जाच्या ४६ सामन्यांमध्ये १६६ बळी मिळवले आहेत. एवढे प्रभावी यश त्याला कारकीर्दीत थोडेसे उशिरा मिळाले असले तरी भारतीय संघात स्थान मिळविण्याबाबत तो आशावादी आहे.

*  यंदाच्या रणजी मोसमातील कामगिरीबाबत तुला काय वाटते?

आम्हाला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर बादफेरीत स्थान मिळविण्यासाठी आम्हाला दोन-तीन सामन्यांमध्ये निर्णायक विजय मिळविणे अनिवार्य होते. आम्ही विदर्भ व आसाम या दोन्ही तुल्यबळ संघांविरुद्ध हे विजय मिळविले व त्या विजयात मी खारीचा वाटा उचलला, याचे मला खूप समाधान वाटत आहे. तसेच यंदा साखळी गटातील सामने त्रयस्थ ठिकाणी असल्यामुळे आमच्यासमोर वेगळेच आव्हान होते. खेळपट्टी किंवा वातावरणाचा फायदा कोणालाच मिळत नसल्यामुळे प्रत्येक खेळाडूचे खरे कौशल्य यंदा पाहायला मिळत आहे. या पाश्र्वभूमीवर मला मिळालेले यश मुलखावेगळे आहे, असे मी म्हणेन. या कामगिरीमुळे मला भारतीय संघात स्थान मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.

*  खेळाची पाश्र्वभूमी नसताना क्रिकेटमध्येच कारकीर्द घडवण्याचा निर्णय कसा घेतला?

मी अहमदनगरचा रहिवासी आहे. आमची कौटुंबिक पाश्र्वभूमी व्यापाराची असली तरी घरातील सर्व जण क्रिकेट व अन्य काही खेळांचे चाहते आहेत. लहानपणी मी जवागल श्रीनाथ व व्यंकटेश प्रसाद यांची गोलंदाजी पाहायचो. तेव्हा त्यांच्यासारखी गोलंदाजी आपण केली पाहिजे असे मला नेहमी वाटायचे. आमच्या शहरातील समर्थ क्रिकेट अकादमीत श्रीकांत निंबाळकर यांच्याकडून मला क्रिकेटचे बाळकडू मिळाले. त्यानंतर पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेताना देवधर ट्रस्टकडून खेळण्याची मला संधी मिळाली. तेथे मला राजाभाऊ व श्याम ओक या पिता-पुत्रांचे मार्गदर्शन लाभले. जसदनवाला करंडक व सी.के. नायडू स्पर्धेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर मला महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले. आता वृत्तपत्रांमध्ये माझे छायाचित्र पाहिल्यावर घरचे सर्व जण खूश होतात. माझी पाच वर्षांची मुलगी मला लगेच फोन करून अभिनंदन करते, ही माझ्यासाठी खूप मोठी पावती असते.

*  महाराष्ट्राचे प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी व कर्णधार केदार जाधव यांच्याकडून कसे मौलिक मार्गदर्शन मिळते?

हे दोघेही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शक आहेत. वेळोवेळी मी कशी गोलंदाजी केली पाहिजे, याबाबत त्यांच्याकडून मला खूप मौलिक सूचना मिळत असतात. मी दोन्ही पद्धतीने स्विंग गोलंदाजी करतो तसेच कटर्सही टाकतो. दिशा व अचूकता यावर कसा भर दिला पाहिजे हेदेखील ते सांगतात. केदारने काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून भाग घेतला आहे. तेथील त्याच्या अनुभवाची शिदोरी आम्हालाही मिळत असते. कल्याणी यांना जरी भारतीय संघात स्थान मिळाले नसले तरी त्यांचा क्रिकेटमधील अनुभव खूप गाढा आहे. यंदा आम्ही आतापर्यंत जे यश मिळविले आहे, त्यामध्ये या दोघांचाही सिंहाचा वाटा आहे.

*  वेगवान गोलंदाजांसाठी तंदुरुस्तीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या दृष्टीने तू काय करतोस?

नियमित पूरक व्यायाम व योग्य संतुलित आहार हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. ज्या वेळी सामने असतात, त्या वेळी आमच्या संघाचे प्रशिक्षक व ट्रेनर सांगतील त्याप्रमाणे मी व्यायाम करतो. एरवी नगर येथे निंबाळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी एकाग्रतेने व्यायाम करतो. सामने खेळताना दुखापती होणार नाहीत या दृष्टीने मी काळजी घेत असतो. शंभर टक्के तंदुरुस्ती असेल तरच तुम्हाला परिपूर्ण यश मिळते, अशी माझी भावना आहे व त्यासाठी मी झगडत असतो.

Story img Loader