वेगवान गोलंदाजांसाठी पर्वणी ठरणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टीचा सापळा प्रतिस्पध्र्याना नामोहरम करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर तयार करण्यात आला होता. परंतु ‘शिकारी खुद यहाँ शिकार हो गया..’ अशीच काहीशी अवस्था शुक्रवारी मुंबई संघाची झाली आहे. जय-पराजयाचे पारडे कुणाकडे झुकेल, याची उत्कंठा तिसऱ्या दिवसअखेर अनुत्तरित आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी कमावलेले यश फलंदाजांनी मातीमोल ठरवल्यामुळे पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राला सामन्यात परतण्याची पुरेशी संधी मिळाली. आता ४०वेळा रणजी जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदा उपांत्य फेरीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर महाराष्ट्राच्या नऊ फलंदाजांना २२४ धावांच्या आत तंबूत धाडण्याशिवाय पर्याय नाही. रणजी करंडक स्पध्रेच्या इतिहासात फक्त दोनदा महाराष्ट्राने चौथ्या डावातील फलंदाजीच्या बळावर अडीचशेहून अधिक धावांचे आव्हान पेलले आहे. महाराष्ट्र त्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार की मुंबईचा संघ आपला रुबाब टिकवणार, अशा आशा-निराशेच्या हिंदोळय़ावर हे पारंपरिक वैर शिगेला पोहोचले आहे.
मुंबई-महाराष्ट्र यांच्या लढतीचा तिसरा दिवस वेगवान गोलंदाजांच्या वर्चस्वामुळे फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. दिवसभरात १४ फलंदाज बाद झाले. सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या तळाच्या फलंदाजांनी दीड तास किल्ला लढवला. श्रीकांत मुंडे (३८) आणि अक्षय दरेकर (३६) यांनी आठव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केल्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या डावात जेमतेम २८० धावा करता आल्या. शार्दूल ठाकूरने ८६ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधली.
त्यानंतर १२२ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजीचा बुरुज महाराष्ट्राच्या वेगवान त्रिकुटापुढे अनपेक्षितरीत्या फक्त १२९ धावांत ढासळला. अनुपम संकलेचाने मुंबईच्या आघाडीच्या फळीला हादरवल्यामुळे त्यांची ५ बाद २९ अशी दयनीय अवस्था झाली. मग सूर्यकुमार यादव (३३) आणि इक्बाल अब्दुल्ला (२७) यांनी सहाव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीकांत मुंडेने या दोघांसह झहीर खानलाही बाद करून मुंबईच्या आक्रमणातील हवाच काढली. तळाच्या फलंदाजांना घेऊन शार्दूल ठाकूरने (३३) निकराची झुंज दिली. परंतु महाराष्ट्राच्या अप्रतिम गोलंदाजीपुढे मुंबईचा निभाव लागला नाही. त्यांच्या चिराग खुराणाने दुसऱ्या स्लिपमध्ये वसिम जाफर, आदित्य तरे आणि अभिषेक नायर यांचे सुरेख झेल टिपले. या झेलच्या हॅट्ट्रिकचा आनंदही खुराणाने ‘धूम-३’मधील आमिर खानप्रमाणे टोपी उंचावून साजरा केला.
महाराष्ट्राने २५२ धावांचे लक्ष्य स्वीकारून तिसऱ्या दिवसाची उर्वरित षटके खेळण्याचा निर्धार केला होता. हर्षद खडीवालेने संयम बाळगला असताना खुराणाने मात्र योग्य चेंडू पाहून फटकेबाजी सुरू केली. परंतु तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर अनुभवी कर्णधार झहीरने खुराणाला बाद करून मुंबईचा आत्मविश्वास वाढवला आहे. महाराष्ट्राने दिवसअखेर १ बाद २८ धावा केल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४०२
महाराष्ट्र (पहिला डाव) : ८४.३ षटकांत सर्व बाद २८० (केदार जाधव ५१, अंकित बावणे ८४, श्रीकांत मुंडे ३८, अक्षय दरेकर ३६; शार्दूल ठाकूर ६/८६, जावेद खान २/४९)
मुंबई (दुसरा डाव) : ३८.१ षटकांत सर्व बाद १२९ (सूर्यकुमार यादव ३३, इक्बाल अब्दुल्ला २७, शार्दूल ठाकूर ३३; समद फल्लाह ३/४५, अनुपम संकलेचा ४/५७, श्रीकांत मुंडे ३/२६)
महाराष्ट्र (दुसरा डाव) : ८.४ षटकांत १ बाद २८ (चिराग खुराणा १७; झहीर खान १/५)
रणजी वृत्तांत
कर्णधार शुक्लाने बंगालला सावरले
कोलकाता : दुसऱ्या डावात अडचणीत सापडलेल्या बंगालच्या संघाला रेल्वेविरुद्धच्या उपांत्य पूर्व सामन्यामध्ये कर्णधार लक्ष्मी रतन शुक्लाने सावरले. दुसऱ्या डावात ४ बाद ३६ अशी अवस्था असताना बंगालचा संघ झटपट तंबूत परतेल असे वाटत होते. पण शुक्लाने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६३ धावांची खेळी साकारत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. शुक्लाला यावेळी ३ चौकारांनिशी नाबाद ३० धावांची संयमी खेळी साकारणाऱ्या वृद्धिमान साहाने सुयोग्य साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची अभेद्य भागीदारी रचल्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर बंगालला ४ बाद १३३ अशी मजल मारला आली. बंगालकडे एकूण १३६ धावांची आघाडी असून त्यांच्या सहा विकेट्स बाकी आहेत. तत्पूर्वी, दुसऱ्या दिवस अखेर सुस्थितीत असलेल्या रेल्वेला बंगालवर आघाडी मिळवता आली नाही आणि त्यांना अवघ्या चार धावा कमी पडल्या. महेश रावत (११९) आणि अरिंदम घोष (९७) यांना रेल्वेला आघाडी मिळवून देण्यात अपयश आले आणि त्यांचा डाव ३१४ धावांवर संपुष्टात आला.
जम्मू-काश्मीरला विजयासाठी २४७ धावांची गरज
बडोदा : जम्मू-काश्मीर आणि पंजाब यांच्यातील सामना चांगला रंगतदार अवस्थेत असून जम्मू आणि काश्मीरला विजयासाठी अजून २४७ धावांची, तर पजाबला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज असून सामना चांगलाच दोलायमान अवस्थेमध्ये आहे. दुसऱ्या डावातही पंजाबच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. पण मनदीप सिंगने १४ चौकारांच्या जोरावर १०१ आणि गुरुक्रीत सिंगने ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६६ धावांची खेळी साकारल्याने पंजाबला दुसऱ्या डावात २९६ धावांपर्यंत मजल मारता आली. जम्मू-काश्मीरचा कर्णधार परवेझ रसून याने या डावात पाच विकेट्स मिळवल्या. विजयासाठी ३२४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या जम्मू आणि काश्मीर संघाला आश्वासक सुरुवात करता आली नाही. तिसऱ्या दिवसअखेर त्यांची २ बाद ७७ अशी अवस्था झाली असून त्यांच्याकडे आठ फलंदाज शिल्लक आहेत.
उ. प्रदेशची सामन्यावर पकड
बंगळुरू : कर्नाटकचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी संपुष्टात आणल्यामुळे उ.प्रदेशने सामन्यावर पकड मजबूत करीत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. कर्नाटकचा दुसरा डाव अली मुर्तुझाच्या भेदक गोलंदाजीपुढे गडगडला. मुर्तुझाने या वेळी सहा विकेट्स मिळवत कर्नाटकच्या डावाला खिंडार पाडले. लोकेश राहुलने साकारलेल्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकला दुसऱ्या डावात २०४ धावा करता आल्या आणि त्यांनी उ. प्रदेशपुढे ३३३ धावांचे आव्हान ठेवले. कर्नाटकच्या आव्हानाचा पाठलाग करताना उ. प्रदेशची दुसऱ्या डावात १ बाद ५५ अशी स्थिती असून त्यांना विजयासाठी अजूनही २७८ धावांची गरज आहे.