मुंबई उपनगरचा हाविश असरानी व पुण्याची पृथा वर्टीकर यांनी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे मिडजेट मुले व मुलींचे विजेतेपद पटकावले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत हाविशने अंतिम फेरीत आपलाच सहकारी कृश शेट्टीवर ११-८, ९-११, ११-८, ११-४ अशी मात केली. त्याने टॉपस्पीन फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. उपांत्य फेरीत त्याने दक्ष जाधवला ३-१ अशा गेम्सने हरवले. कृशने उपांत्य लढतीत राज कोठारीचा ३-१ असा पराभव केला.
या मोसमात सातत्यपूर्ण अव्वल दर्जाची कामगिरी करणाऱ्या पृथाने विजेतेपदावर मोहर उमटवली व आपल्या नावावर आणखी एक विजेतेपद केले. तिने अंतिम लढतीत मुंबई उपनगरची खेळाडू अनया चांदेला ११-३, ११-४, ११-९ असे सरळ तीन गेम्समध्ये नमवले. तिने काऊंटर अॅटॅक पद्धतीचा उपयोग केला, तसेच तिने चॉप्सचाही उपयोग केला. उपांत्य लढतीत तिने साची दळवीचे आव्हान ३-० अशा गेम्समध्ये संपवले होते. अनयाने जुई पेंढारकरला संघर्षपूर्ण लढतीनंतर ३-२ अशा गेम्समध्ये पराभूत केले.