राज्यातील गुणवत्तेला वाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्पर्धाचे आयोजन करायला सुरुवात केली. यामध्ये कबड्डी, खो-खो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार खेळांचा समावेश असून, राज्य सरकारने या स्पर्धाचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला.
या वर्षीच्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान पुण्यामधील शिरुरच्या न्यू इंग्लिश शाळेला मिळाला आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी १६ संघ सहभागी म्हणजे एकूण ३२ संघांचे ५५० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये १४,३०,००० रुपयांची रोख बाक्षिसे आणि पदके देण्यात येणार आहेत.
खाशाबाज जाधव स्मृतिचषक कुस्ती स्पर्धा यावर्षी जालनामध्ये होणार आहे. ही स्पर्धा ‘फ्री-स्टाइल’ आणि ‘ग्रिको रोमन’ या दोन प्रकारांमध्ये होणार आहेत. या स्पर्धेत पुरुषांचे २० आणि महिलांचे १० असे एकूण ३७० कुस्तीपटू खेळणार आहेत. या स्पर्धेमध्ये ३०,२९,००० रुपयांची रोख बक्षिसे आणि पदके देण्यात येणार आहेत.
यावर्षी भाई नेरुरकर स्मृतिचषक खो-खो स्पध्रेचे आयोजन नागपूरमधील काटोल येथे करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १४ वर्षांखालील मुले व मुली, वरिष्ठ गट पुरुष व महिला या गटांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये २० मुले/पुरुष आणि २० मुली/ महिलांचे संघ सहभागी होणार असून, एकूण ४० संघांचे ६३० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेमध्ये १९,०४,४०० रुपयांची रोख पारितोषिके आणि पदके देण्यात येतील.
छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा या वर्षी यवतमाळमधील राळेगाव येथे भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा १९ व २१ वर्षांखालील मुले व मुली या गटांमध्ये होणार असून, मुलांचे आणि मुलींचे प्रत्येकी १६ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेत १७,६५,४०० रुपयांची रोख बक्षिसे आणि पदके देण्यात येतील.

Story img Loader