शेगावात सुरू असलेल्या १५ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पध्रेच्या तिसऱ्या दिवशी पुरुष गटात महाराष्ट्राच्या संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या संघाने चमकदार कामगिरी करू न उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. महाराष्ट्र संघाने आतापर्यंतच्या चारही सामन्यात आपल्या प्रतिस्पर्धावर विजय नोंदविला आहे. दुसरीकडे मुलींच्या महाराष्ट्र संघाचीही आगेकूच सुरू आहे.
शेगाव येथील गजाननदादा पाटील मार्केट यार्डच्या मैदानावर महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन आणि गोदाई शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पध्रेच्या अजिंक्यपद स्पध्रेत सोमवारी सकाळी महाराष्ट्र विरुध्द ओदिशा हा सामना झाला. यात महाराष्ट्र संघाने ३-२ असा विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरुष संघाची उपांत्यफेरीत निवड झाली आहे. त्याचबरोबर कर्नाटक विरुध्द आंध्रप्रदेश या सामन्यात कर्नाटक संघाने ३-० ने बाजी मारली. दिल्लीने जम्मू-काश्मीर संघावर ३-० ने विजय मिळवला. तामिळनाडू संघाने मध्यप्रदेश संघावर ३-० ने, तर केरळ संघानेही ३-० ने गुजरातवर विजय नोंदविला.
मुलींच्या संघात केरळने उत्तर प्रदेश संघाला ३-० ने मात दिली. साई विरुध्द त्रिपुरा सामन्यात साईने विजय मिळविला. तामिळनाडूने झारखंडला ३-१ ने हरविले, तर महाराष्ट्र संघाने बिहारला नमवून पहिल्या सामन्यातील प्रथम विजय मिळविला. कर्णधार काजल मोरे व स्नेहा खरात या दोघींनी केलेल्या चांगल्या  कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला हा विजय मिळाला. शेगावात युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धानी वेगळीच रंगत आणली आहे. सामन्याचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी, २४ जानेवारीला अंतिम अजिंक्यपद सामना होईल व व्हॉलीबॉलचा युवा राष्ट्रीय संघ निवडला जाईल, असे दिलीपबापू देशमुख व किरणबापू देशमुख यांनी सांगितले.

Story img Loader