रणजी पदार्पण करणारा विजय झोल याच्या साथीत हर्षद खडीवाले याने अखंडित ९३ धावांची भागीदारी केली, त्यामुळेच महाराष्ट्रास त्रिपुराविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात १ बाद १३३ अशी दमदार सुरुवात करता आली. त्याआधी त्रिपुराचा पहिला डाव ३०४ धावांमध्ये आटोपला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. त्रिपुराने ७ बाद २५५ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. आणखी ४९ धावांची भर घातल्यानंतर त्यांचा डाव आटोपला. पहिल्या दिवशी नाबाद १०५ धावा करणाऱ्या योगेश ताकवले याने तिमिर चंदाच्या साथीत सातव्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर त्यांचा डाव घसरला. ताकवले याने शैलीदार खेळ करीत १२५ धावा जमविल्या. त्यामध्ये त्याने १३ चौकार व तीन षटकार अशी फटकेबाजी केली. चंदा याने सात चौकारांसह ४३ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सचिन चौधरी (४/४४) व श्रीकांत मुंढे (३/७१) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
महाराष्ट्राने सलामीवीर चिराग खुराणा (३ चौकारांसह २२) याची विकेट लवकर गमावली मात्र त्यानंतर नवोदित खेळाडू झोल याने खडीवाले याला चांगली साथ दिली. या जोडीने आश्वासक फलंदाजी करीत त्रिपुरास आणखी यश मिळविण्यापासून वंचित ठेवले. खडीवाले याने नाबाद ६४ धावा करताना दहा वेळा चेंडू सीमापार केला. झोल याने सात चौकारांसह नाबाद ४२ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : त्रिपुरा पहिला डाव १०९.५ षटकांत सर्व बाद ३०४ (योगेश ताकवले १२५, तिमिर चंदा ४३, श्रीकांत मुढे ३/७७, सचिन चौधरी ४/४४, अक्षय दरेकर २/६२)
 महाराष्ट्र : पहिला डाव ४७ षटकांत १ बाद १३३ (हर्षद खडीवाले खेळत आहे ६४, चिराग खुराणा २२, विजय झोल खेळत आहे ४२, दत्ता राणा १/३२)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा