रणजी करंडक क्रिकेट

हर्षद खडीवाले याचे शतक हुकले, मात्र त्याने संग्राम अतितकर याच्या साथीत केलेल्या १७६ धावांच्या भागीदारीमुळेच महाराष्ट्रास ओडिशाविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना अनिर्णीत ठेवण्यात मंगळवारी यश आले. हा सामना संबळपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
पहिल्या डावात १२६ धावांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राने १ बाद ७३ धावांवर दुसरा डाव आज पुढे सुरू केला. खडीवाले व अतितकर या नाबाद जोडीने आत्मविश्वासाने खेळ करीत संघाच्या डावास आकार दिला. त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भर घातली. ओडिशाच्या लगनजित सामल याने खडीवाले याला शतकापूर्वीच तंबूत धाडले. खडीवाले याने शैलीदार खेळ करीत १४ चौकारांसह ९२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर महाराष्ट्राकडून मोठी भागीदारी झाली नाही तरी अतितकर, अंकित बावणे व चिराग खुराणा यांनी अर्धशतके टोलवत संघास दुसऱ्या डावात ५ बाद ३३३ धावा जमविण्यात यश मिळवून दिले. अतितकर याने १३ चौकारांसह ८८ धावा केल्या, तर बावणे याने नाबाद ५२ धावा करताना आठ चौकार मारले. खुराणा याने सात चौकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ओडिशास तीन गुण मिळाले.
 संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ३१५ व ५ बाद ३३३ (हर्षद खडीवाले ९२, संग्राम अतितकर ८८, अंकित बावणे नाबाद ५२, चिराग खुराणा नाबाद ५२, लगनजित सामल ४/६८) विरुद्ध ओडिशा : ४४१.    

Story img Loader