बिपलाब समंतराय याच्या झंझावाती शतकाच्या जोरावर ओदिशाने महाराष्ट्रापुढे १८४ धावांचे आव्हान ठेवले. वरकरणी ही अवघड वाटणारी कामगिरी महाराष्ट्राने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केली आणि मुश्ताक अली ट्वेन्टी२० स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.
समंतराय व गोविंद पोड्डर यांनी तिसऱ्या विकेटसाठी षटकामागे दहा धावांचा वेग ठेवीत तडाखेबाज शतकी भागीदारी रचली. समंतराय याने आक्रमक १०२ धावा केल्या, तर पोड्डर याने धुवाधार खेळ करीत ६२ धावा केल्या. त्यांनी महाराष्ट्रापुढे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रयाग भाटी व अंकित बावणे यांनी केलेल्या झंझावाती भागीदारीमुळेच महाराष्ट्राने चार गडी राखून विजय मिळविला.
ओदिशाने पहिले दोन गडी अवघ्या अकरा धावांत गमावले, मात्र त्यानंतर समंतरायच्या साथीस पोड्डर खेळावयास आला आणि खेळाचा नूरच पालटविला. या जोडीने चौफेर फटकेबाजी करीत १५ षटकांमध्ये १५५ धावांची भागीदारी रचली. समंतराय याने ५९ चेंडूंमध्ये १०२ धावा केल्या. त्यामध्ये आठ चौकार व सहा षटकारांचा समावेश होता. पोड्डर याने दोन चौकार व पाच षटकारांसह ६३ धावा केल्या.
चिराग खुराणा (३७) व कर्णधार केदार जाधव (२०) यांनी चमक दाखवूनही महाराष्ट्राचा डाव एकवेळ ५ बाद ८४ असा अडचणीत सापडला होता. त्या वेळी महाराष्ट्रास उर्वरित ८.४ षटकांत १०० धावांची आवश्यकता होती. भाटी व बावणे यांनी विजय मिळविण्याचे शिवधनुष्य समर्थपणे पेलले. त्यांनी आक्रमक खेळ करीत ८.२ षटकांत ९७ धावांची भागीदारी करीत संघाचा विजय दृष्टिपथात आणला. विजयासाठी तीन धावांची गरज असताना भाटी बाद झाला. मात्र बावणे याने श्रीकांत मुंडेच्या साथीत विजयावर शिक्कामोर्तब केले. भाटी याने ३३ चेंडूंत ४४ धावा करताना तीन षटकार व तीन चौकार अशी फटकेबाजी केली. बावणे याने २४ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या. त्यामध्ये तीन चौकार व चार षटकारांचा समावेश होता.
संक्षिप्त धावफलक
ओदिशा २० षटकांत ४ बाद १८३ (बिपलाब समंतराय १०२, गोविंद पोड्डर ६३, अनुपम संकलेचा २/२३) पराभूत वि. महाराष्ट्र २० षटकांत ६ बाद १८४ (चिराग खुराणा ३७, केदार जाधव २०, प्रयाग भाटी ४४, अंकित बावणे नाबाद ४९)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra thrilling victory on odisha in mushtak ali t20