अभिमन्यू इस्वरन, सयान मोंडल आणि सुदीप चॅटर्जी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगालने महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या लढतीत पहिल्या दिवशी ३ बाद २३९ अशी मजल मारली. मात्र बंगालची धावगती कासवाच्या गतीसारखी राहिली.
महाराष्ट्राचा कर्णधार रोहित मोटवानीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इस्वरन-मोंडल जोडीने १२८ धावांची सलामी देत मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. समद फल्लाने इस्वरनला बाद करीत ही जोडी फोडली. त्याने ६ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. लगेचच चिराग खुराणाने मोंडलला त्रिफळाचीत केले. त्याने ८ चौकारांसह ५८ धावा केल्या. यानंतर चॅटर्जी आणि कर्णधार मनोज तिवारी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. डॉमिनिक मुथ्थुस्वामीने तिवारीला बाद केले. त्याने ३० धावा केल्या. तिवारी बाद झाल्यावर बंगालची धावगती आणखी मंदावली. उर्वरित वेळेत एकेरी-दुहेरी धावांवर भर देत चॅटर्जी-श्रीवत्स गोस्वामी जोडीने बंगालला पहिल्या दिवसअखेर सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. चॅटर्जी ५१, तर गोस्वामी २१ धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक
बंगाल (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद २३९ (अभिमन्यू इस्वरन ६५, सयान मोंडल ५८, श्रीवत्स गोस्वामी खेळत आहे ५१, समद फल्ला १/३९).

Story img Loader