अमित मिश्रा व मोहीत शर्मा यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंच्या हरयाणा संघास महाराष्ट्र संघ कसा सामोरे जाणार हीच उत्सुकता या दोन संघांमध्ये रविवारपासून सुरू होत असलेल्या रणजी क्रिकेट लढतीबाबत निर्माण झाली आहे. येथील बन्सीलाल स्टेडियमवर हा सामना होत आहे.
महाराष्ट्रास पहिल्या सामन्यात ओडिशाविरुद्ध केवळ तीन गुणांवर समाधान मानावे लागले होते. हरयाणा संघास स्थानिक अनुकूल हवामान, खेळपट्टी व प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घेता महाराष्ट्रास पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविण्यासाठीही कडवी लढत द्यावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात हरयाणास पंजाबकडून १२० धावांनी पराभूत व्हावे लागले होते ही महाराष्ट्रासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने हर्षद खडीवाले, चिराग खुराणा, केदार जाधव, कर्णधार रोहित मोटवानी, संग्राम अतितकर यांच्यावर आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघात केदार जाधव याची निवड झाली असल्यामुळे त्याच्याकडून येथे मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत समाद फल्लाह, डॉमिनिक मुथ्थुस्वामी, श्रीकांत मुंढे यांच्याकडून अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे. महाराष्ट्राने गेल्या रणजी मोसमात उपविजेतेपद मिळविले होते.
दोन्ही संघ-हरयाणा-सनी सिंग (कर्णधार), अमित मिश्रा, यजुर्वेद्र चहाल, आशिष हुडा, जोगिंदर शर्मा, सचिन राणा, कामरान शेख, जयंत यादव, अवी बारोट, राहुल दलाल, कुलदीप हुडा, अभिमन्यु खोड, नितीन सैनी, मोहित शर्मा, प्रियांक तेहलान.
महाराष्ट्र- रोहित मोटवानी (कर्णधार), संग्राम अतितकर, अवधूत दांडेकर, डॉमिनिक मुथ्थुस्वामी, स्वप्नील गुगळे, हर्षद खडीवाले, निखिल नाईक, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, चिराग खुराणा, अक्षय दरेकर, समाद फल्लाह, केदार जाधव, श्रीकांत मुंढे, अनुपम संकलेचा, विजय झोल.
मुंबई विजयपथावर परतणार?
नवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेच्या सलामीलाच दुबळ्या जम्मू आणि काश्मीर संघाकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर आता मुंबईला विजयपथावर परतण्याचे वेध लागले आहेत. रविवारपासून नवी दिल्लीत सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात मुंबईची गाठ रेल्वेशी पडणार आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे मुंबईकर खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याचा फटका मुंबईला बसला होता. त्यातच आता अनुभवी फलंदाज वासिम जाफर जायबंदी झाला असून वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीही ऑस्ट्रेलियासाठी प्रयाण करणार आहे. त्यामुळे या अनुभवी खेळाडूंची उणीव मुंबईला जाणवणार आहे. त्यामुळे रेल्वेविरुद्धच्या सामन्यात हिकेन शाह आणि ऑफस्पिनकर अक्षय गिरप यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.