उपनगरच्या ऋषीकेश मुर्चावडेला वीर अभिमन्यू तर ,ठाण्याच्या कविता घाणेकरला जानकी पुरस्कार
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या ३५व्या कुमार व मुली (१८वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. अतिशय संघर्षमय लढतीत महाराष्ट्राच्या कुमारांनी केरळचे तर मुलींनी कर्नाटकचे कडवे आव्हान मोडीत काढले. स्पध्रेतील कुमार गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार महाराष्ट्राच्या ऋषीकेश मुर्चावडेने तर मुलींच्या गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार कविता घाणेकरने पटकावला.
मुलींच्या गटातील अंतिम लढतीत महाराष्ट्राने कर्नाटकवर (४-३, ४-३) ८-६ अशी २ गुणांनी मात करून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. नाणेफेकीचा कौल कर्नाटकने जिंकून संरक्षण स्वीकारले. मध्यंतराला सामना दोलायमान अवस्थेत होता. महाराष्ट्राकडे निव्वळ एका गुणाची आघाडी होती. दुसऱ्या डावात आक्रमणात महाराष्ट्राने चार गुण नोंदवले. शेवटच्या आक्रमणात कर्नाटकला विजयासाठी सहा गुणांची गरज होती. परंतु महाराष्ट्राच्या कविता घाणेकरने बचावात ३.४० मिनिटांची निर्णायक खेळी केली व त्यानंतर साजल पाटीलने १.५० मिनिटे नाबाद खेळी करून कळस चढवला. कविताने पहिल्या डावातसुद्धा ४ मिनिटे सुरेख हुलकावण्या दिल्या. प्रियांका भोपी (४.२० मी. व १.४० मी.), काजल भोर (३ गडी), प्रणाली बेनके (१.५० मी.) व निकिता भुजबळ (२ गडी) यांनी मोलाची कामगिरी केली. कर्नाटकच्या मेघा के. एस. (४.२० मी. व ३.२० मी.), पल्लवी बी. (२.४० मी. व १.५० मी.) व वीणा एम. (१.२० मी.) यांनी उल्लेखनीय खेळ केला.
कुमार गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने केरळचा (१०-८, ७-७) १७-१५ असा २ गुण व २ मिनिटे राखून पराभव केला. मध्यंतराला विजयी संघाकडे केवळ २ गुणांची आघाडी होती. महाराष्ट्राच्या ऋषीकेश मुर्चावडेने दोन्ही डावांत निर्णायक क्षणी प्रत्येकी तीन मिनिटांच्या जिगरबाज खेळी उभारून महाराष्ट्राची संरक्षणातील संभाव्य पडझड थांबवली. संकेत कदम (२.३० मी. व ४ गडी) व गजानन शेंगाळ (२ मी. व ४ गडी) यांनीदेखील नेत्रदीपक खेळ केला. केरळच्या अजय मायकलने एकाकी झुंज दिली.

Story img Loader