हुतूतूची सुरुवात महाराष्ट्रात सर्वप्रथम १९१८ मध्ये सातारा येथून झाली. हुतूतू ते कबड्डी हा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्राच्या कबड्डीला मग विकासाचे अनेक टप्पे पार करावे लागले. त्या ऐतिहासिक घटनेला एकीकडे शंभर वर्षे पूर्ण होत असताना कबड्डीच्या राष्ट्रीय नकाशावर गेली काही वर्षे महाराष्ट्र शोधावा लागत होता. मागील वर्षीचा कबड्डीचा विश्वचषक असो किंवा महिन्याभरापूर्वी झालेली आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, भारतीय पुरुष संघात महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला स्थान नव्हते. हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, सेनादल, भारतीय रेल्वे या संघांचे म्हणजेच उत्तरेचे कबड्डीवर गेली काही वर्षे वर्चस्व होते. त्यामुळे महाराष्ट्राचे खेळाडू म्हणजे तंदुरुस्तीचा अभाव असलेले, कौशल्य नसलेले असे शिक्के मारले जात होते. ही कारणे कमी पडली म्हणून की काय, पारपत्र नसताना महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय शिबिरात कसे काय येऊ शकतात, अशी कारणे देण्यात आली. परंतु रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने शुक्रवारी राज्य अजिंक्यपद जिंकून उत्तरेची सद्दी संपवण्याचा पराक्रम दाखवला. या पराक्रमाचे गोडवे गाताना आत्मपरीक्षणाचीही गरज आहे.
कबड्डीचा इतिहास जरी महाराष्ट्राचा असला तरी वर्तमान आणि भविष्यकाळ हा उत्तरेच्या राज्यांसाठी आहे, याच आविर्भावात या खेळाची गेली काही वर्षे वाटचाल सुरू होती. आधुनिक कबड्डी ही आज उत्तरेत दिसते. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये आजची कबड्डी दिसत नाही, अशी अनेक मते या खेळातील जाणकार गेल्या काही वर्षांत व्यक्त करायचे. कबड्डीच्या प्रशासनावर हुकमत असलेल्या जनार्दनसिंग गेहलोत आणि त्यांच्या प्रधान मंडळाने वेळोवेळी महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाबाबत कधीच सहानुभूती दाखवली नाही. त्यामुळे प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, अनुप कुमार, मनजीत चिल्लर, मोहित चिल्लर, नितीन तोमर आदी उत्तरेच्या खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत गेली. प्रो कबड्डी लीगच्या व्यासपीठावरसुद्धा उत्तरेचाच बोलबाला होता. हे वर्चस्व अगदी लिलावातसुद्धा सहज अधोरेखित व्हायचे. महाराष्ट्राच्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना जी काही संधी मिळाली, त्याचे त्यांनी सोने केले. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील यश मिळवताना महाराष्ट्राने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि सेनादल यांच्यासारख्या उत्तरेच्या संघांना अस्मान दाखवले. उत्तरेच्या संघात राहुल चौधरी होता, तर सेनादलात नितीन तोमर, मनू गोयल. परंतु महाराष्ट्राच्या भक्कम बचावापुढे त्यांची मात्रा चालली नाही. याशिवाय उपांत्य फेरीत कर्नाटकसारख्या बलाढय़ संघावर मात केली. या संघात प्रशांत कुमार राय, सुकेश हेगडे, जीवाकुमार आणि प्रभंजनसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश होता.
महाराष्ट्राच्या यशाचे खरे श्रेय जाते, ते रिशांक देवाडिगाला. पहिल्या चढाईपासून अखेरच्या चढाईपर्यंत तितक्याच आत्मविश्वासाने आणि क्षमतेने खेळणाऱ्या रिशांकने प्रो कबड्डीमधील अनुभवातून नेतृत्व आणि कौशल्याचे धडे घोटवल्याचे त्याच्या खेळातून सहज दिसून येते. त्याला पूरक साथ मिळाली, ती महत्त्वाच्या क्षणी प्रतिस्पध्र्याचा बचाव भेदणाऱ्या नितीन मदनेची. डावा कोपरारक्षक गिरीश इर्नाक, ऋतुराज कोरवी, विकास काळे यांच्या बचाव फळीने चीनच्या भिंतीप्रमाणे आपली अभेद्यता सिद्ध केली. महाराष्ट्राच्या कबड्डीचे भवितव्य उज्ज्वल आहे, याची प्रचीतीही येथूनच मिळते आहे.
निवडप्रक्रियेचे शिवधनुष्य
पुरुष विभागात ज्या पद्धतीने महाराष्ट्राने इतिहास घडवला, त्याच पद्धतीने हिमाचल प्रदेशसारख्या छोटय़ा राज्याने महिला कबड्डीत भारतीय रेल्वेची मक्तेदारी संपुष्टात आणली. महाराष्ट्राला महिलांमध्येही यश मिळवता आले असते, मात्र निवडप्रक्रियेच्या राजकारणाचा मोठा फटका महिला संघाला बसला. दोन वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने संघबदल करून घोळ घातला गेला होता, त्याचीच पुनरावृत्ती यंदा पुन्हा दिसून आली. खरे तर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आणि त्या अनुषंगाने राज्याच्या दोन्ही संघांची निवडप्रक्रिया हे शिवधनुष्य पेलणे राज्य कबड्डी संघटनेला आव्हान ठरत आहे. संघटना म्हटली की गटातटांचे राजकारण आले. काही विशिष्ट जिल्ह्यांचे वर्चस्व आले. निवड समिती सदस्यांनी दिलेल्या संघाच्या यादीला अंतिम स्वरूप राज्य संघटना देते. यंदा दोन्ही गटांच्या अंतिम सामन्यांना मोजक्याच निवड समिती सदस्यांना बोलावण्यात आले होते. प्रशिक्षकाला संघासोबत खेळायचे असते. मात्र महाराष्ट्राची संघनिवड करताना प्रशिक्षकाचे मत विचारात घेतले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीचे वेध लागलेल्या राज्यातील संघटकांनी आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे.
गुणवत्ता शोध व जोपासना हवी
राष्ट्रीय स्पर्धा जवळ आल्यावर १५ दिवस अगोदर विशेष शिबीर लावले जाते; परंतु त्यांची वारंवार शिबिरे होण्याची आवश्यकता आहे. त्यांना एकत्रितपणे खेळण्याची पुरेशी संधी मिळायला हवी. तसेच तंत्रशुद्ध तंदुरुस्तीसुद्धा जपता यायला हवी. काही महिन्यांपूर्वी सांगलीत राज्यातील कबड्डीपटूंसाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तंदुरुस्तीतज्ज्ञ, सरावतज्ज्ञ, मानसिकता, आदी विविध पद्धतीने या खेळाडूंना मार्गदर्शन देण्यात आले होते. गुणवत्ता शोध आणि जोपासना करणाऱ्या तसेच खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या अशाच काही योजनांची राज्य कबड्डीला गरज आहे. सर्वाधिक स्थानिक व व्यावसायिक संघ, सर्वात जास्त स्पर्धा आणि सर्वाधिक गुणी खेळाडू अशी खासियत असताना राज्याच्या कबड्डीला आलेले हे वैभवाचे दिवस कसे टिकून राहतील, याचा विचार झाला तरच हे विजेतेपद नवसंजीवनी देणारे ठरेल.
मातब्बर खेळाडूंच्या सुरुवातीलाच पकडी झाल्या तर नंतर त्यांच्यावर दडपण येते, नेमकी हीच रणनीती गिरीश इर्नाकने वापरली. याचप्रमाणे अखेरच्या काही मिनिटांमध्ये सामना रोमहर्षक अवस्थेत असताना महाराष्ट्राने सामन्यावरील नियंत्रण गमावू दिले नाही. महाराष्ट्राने या विजयाचा एक सकारात्मक लाट म्हणून उपयोग करून घ्यावा. राष्ट्रीय कबड्डीमध्ये महाराष्ट्राला एक प्रकारे मरगळ आली होती. उत्तरेच्या संघापुढे आपला निभाव लागणार नाही, ही अढी निर्माण झाली होती. त्याला छेड देण्याचे कार्य या विजेतेपदाने केले आहे. आगामी फेडरेशन चषक स्पर्धा मुंबई उपनगरात आहे, या वेळी हेच वर्चस्व टिकवण्याचे आव्हान महाराष्ट्रापुढे असेल. या यशामुळे निर्माण झालेली सकारात्मकता तळागाळापर्यंत पोहोचवून नवी गुणवत्ता कशी निर्माण होईल, याची जबाबदारी सर्वस्वी संघटनेवर असेल.
– राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू, प्रशिक्षक
प्रशांत केणी prashant.keni@expressindia.com