होम्बेगौडा, बंगळुरू येथे संपन्न झालेल्या ४८व्या, पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेच्या दोन्ही गटांमध्ये महाराष्ट्रच्या संघांने अंतिम फेरीत स्थान पटकावले होते, महाराष्ट्राला दुहेरी मुकुट मिळणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. महिलांनी अटीतटीच्या लढतीमध्ये केरळला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली खरी, पण पुरुषांना मात्र उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा महिला गटातील मानाचा ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’  महाराष्ट्रच्या सारिका काळेला तर पुरुष गटात ‘एकलव्य पुरस्कार’ रेल्वेच्या विलास करंडेने पटकावला.
महिला गटात अंतिम सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी महाराष्ट्र व केरळ या संघात ‘काँटे की टक्कर ’ होती, पण अखेर महाराष्ट्राने केरळचे कडवे आव्हान (५-५, ६-६, ७-५) १८-१६ असे २ गुणांनी परतवून लावत गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढला. नाणेफेक केरळने जिंकून संरक्षण स्वीकारले, मध्यंतराला ५-५ व दोन्ही डावानंतर ११-११अशी समान गुणस्थिती होती, ही कोंडी फोडण्यासाठी अजून एक (अलाहिदा) डाव खेळवण्यात आला. या डावात प्रथम आक्रमणात महाराष्ट्राने केरळचे ७ गडी बाद केले, या क्षणीसुद्धा सामना दोलायमान परिस्थितीत होता परंतु त्यानंतर संरक्षणात महाराष्ट्राच्या रणरागिणींनी जबरदस्त खेळ केला व अजिंक्यपदावर नाव कोरले. श्वेता गवळीचे नाबाद २ मि. संरक्षण निर्णायक ठरले. विजयी संघाच्या ऐश्वर्या सावंत (३, २ आणि २.२ मिनिटे २ गडी), श्वेता गवळीने २.३, १.२, २ मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. सारिका काळे (१.२. १.४ मिनिटे संरक्षण आणि १ गडी). मीनल भोईरने ५ गडी बाद केले. शिल्पा जाधव व कविता घाणेकर (प्रत्येकी २ गडी) यांनी सुरेख सांघिक विजयाची नोंद करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. केरळच्या रेम्या एस. (२ मि., १.४ आणि १ मिनिट संरक्षण) व रेखामोल (१.५, १.४ मिनिटे संरक्षण आणि ४ गडी) यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
पुरुष गटात महाराष्ट्रातीलच खेळाडूंचा भरणा असलेल्या रेल्वेने महाराष्ट्राचा १९-१४ असा ५ गुणांनी पराभव करून अजिंक्यपद अबाधित राखले. रेल्वेकडून विलास करंडे (१.४, १.२ मिनिटे आणि ३ गडी), योगेश मोरे (१.३, १.५ मि.), पी. आनंदकुमार (१.२, १.२ मिनिटे संरक्षण आणि २ गडी) व रंजन शेट्टी (४ गडी) यांनी आपल्या चतुरस्र खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्राचा दिपेश मोरे (२ मि. व १ गडी), नरेश सावंत (२ मि. व ३ गडी), रमेश सावंत (१.३, १.२ मिनिटे आणि ३ गडी) व मििलद चावरेकर (४ गडी) यांचे प्रयत्न तोकडे पडले.

Story img Loader