अनेक खेळाडूंच्या मूळ किंमती कमी केल्यामुळे त्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा यांच्यासारख्या काही खेळाडूंच्या नाराजीमुळे इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परंतु महाराष्ट्राच्या सात वीरांनी मात्र आयबीएलच्या लिलावामध्ये नेत्रदीपक घोडदौड केल्याचे प्रत्ययास आले आहे. त्यामुळे दाक्षिणात्य राज्यांचे वर्चस्व असलेल्या भारतीय बॅडमिंटनवर महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही छाप असल्याची ग्वाही मिळत आहे.
लंडन ऑलिम्पिकवारी थोडक्यात हुकलेला अजय जयराम पुन्हा आयबीएलच्या निमित्ताने मुख्य प्रवाहात दाखल झाला आहे. चेन्नईत जन्मलेल्या अजयने कारकीर्द मात्र मुंबईत घडवत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. या कामगिरीची योग्य दखल घेत हैदराबाद संघाने अजयला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे.
अश्विनी पोनप्पाच्या साथीने खेळायला सुरुवात केल्यानंतर पुण्याची प्रज्ञा गद्रे प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र त्याआधीही तिने प्राजक्ता सावंत आणि अक्षय देवलकर यांच्या साथीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शन केले होते. अश्विनी-प्रज्ञा जोडीने याच वर्षी चीनच्या अव्वल मानांकित जोडीवर मात करत शानदार विजयाची नोंद केली होती. गोपीचंद अकादमीची विद्यार्थिनी असलेल्या प्रज्ञाला सातत्य, मेहनत, जिद्द आणि विचारातील संतुलितता यासाठी दिल्ली स्मॅशर्स संघाने चमूत समाविष्ट केले आहे.
रुढार्थाने शुभंकर डे हा खेळाडू महाराष्ट्राचा नाही. बॅडमिंटनच्या ध्यासापोटी पश्चिम बंगालहून शुभंकरने थेट ठाणे गाठले. मग श्रीकांत वाड यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. कनिष्ठ पातळीवरील स्पर्धामध्ये शानदार कामगिरी करत शुभंकर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी सज्ज झाला आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या केनिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे त्याने जेतेपद पटकावले. हैदराबादनेच शुभंकरचा आपल्या संघात समावेश केला आहे.
एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात खेळणारी १८ वर्षीय नागपूरकर कन्या रसिका राजे ही मुंबई मास्टर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. कनिष्ठ पातळीवर दमदार प्रदर्शन करणाऱ्या रसिकाचे दोन्ही प्रकारावरचे प्रभुत्व ओळखूनच वय लहान असतानाही दिग्गजांसमवेत तिचा संघात अंतर्भाव करण्यात आला आहे. पैसाइतकेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची आणि सरावाची संधी रसिकासाठी मोठी शिदोरी असणार आहे.
दुहेरी प्रकारात देशातल्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूंमध्ये गणना होणारी प्राजक्ता सावंत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आता प्राजक्ता आपल्या शानदार प्रदर्शनासह टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी आतूर आहे.
दुहेरी हेच उद्दिष्ट असलेल्या ठाण्याच्या अक्षय देवलकरने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ताकदवान स्मॅश आणि जिगरबाज खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षयला संघात स्थान देताना बंगळुरूने दुहेरीची आघाडी बळकट केली आहे.
सायना नेहवालनंतर देशातल्या प्रतिभाशाली महिला खेळाडूंच्या मांदियाळीत नागपूरकर अरुंधती पानतावणेचा समावेश होतो. दुखापतींच्या फेऱ्यातून बाहेर पडत अरुंधतीने गेल्या वर्षी बहरिन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. गोपीचंद अकादमीची विद्यार्थिनी असलेल्या अरुंधतीने नैसर्गिक कौशल्याला सातत्याची जोड दिल्यास ती दिल्ली संघाला उपयुक्त ठरू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा