लालबागच्या ओम साईश्वर क्रीडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पध्रेत पुरुषांमध्ये महात्मा गांधीने अलाहिदा डावात श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाला १९-१७ असे हरवून जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली, तर महिलांमध्ये शिवनेरी अकादमीने जेतेपद पटकावले.
पुरुषांच्या अटीतटीच्या अंतिम फेरीत श्री समर्थने मध्यंतरानंतर सुंदर संरक्षण आणि आक्रमण करीत सामना बरोबरीत आणला. मात्र महात्मा संघाच्या संरक्षकांनी सामना वाचवला. विजयी संघातर्फे दिपक माधवने १:५० मि., १:३० मि., २:२० मि. संरक्षण करीत २ गडी बाद केले. त्याला हर्षद हातणकर व दीपेश मोरे यांनी चांगली साथ दिली. श्री समर्थकडून तेजस शिरसकर, वरुण पाटील व विराज कोठमकरने चांगली लढत दिली.
महिलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने पहिल्या सत्रात २ गुणांची आघाडी घेतली होती, तीच महत्त्वाची ठरली. शिवनेरीकडून खेळताना दर्शना सकपाळने ४:५० मि., १:२० मि. संरक्षण केले व आक्रमणात ३ गडी बाद केले, तर शुभांगी जाधव आणि अमृता भगतने तिला चांगली साथ दिली, तर परांजपेतर्फे श्रुती सकपाळ, मयुरी पेडणेकर आणि प्रज्ञा घाडीगांवकर यांनी अप्रतिम खेळ केला.

Story img Loader