श्रीलंकेचा अनुभवी क्रिकेटपटू महेला जयवर्धने आता इंग्लंड संघाच्या प्रशिक्षक चमूत असणार आहे. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार असून, या ठिकाणी ते पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहेत.
दोन वर्षांपूवी संयुक्त अरब अमिरातीत पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इंग्लंडने सल्लागार म्हणून जयवर्धनेची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. जयवर्धनेची नियुक्ती तूर्तास तरी अमिराती दौऱ्यापुरती मर्यादित आहे. अव्वल दर्जाच्या फिरकीपटूंचा समर्थपणे सामना करण्यात जयवर्धने इंग्लंडच्या फलंदाजांकरिता उपयुक्त ठरणार आहे. याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचे माजी फिरकीपटू मुश्ताक अहमद यांना हंगामी सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बायलिस आणि साहाय्यक प्रशिक्षक पॉल फॅब्रेस यांनी श्रीलंका संघासमवेत प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. या दोघांच्या पुढाकारातूनच जयवर्धनेची सल्लागारपदी निवड झाली आहे.

Story img Loader