श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. चालू वर्षांत मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या दोन मालिका जयवर्धने खेळणार आहे.
श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डी सिल्वा यांना ३७ वर्षीय जयवर्धनेने पत्र लिहून कसोटी क्रिकेटमधून आपण निवृत्ती घेत असल्याचे सांगितले.
‘‘गेली १८ वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करताना जो आनंद आणि सन्मान मिळाला, त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेणे अतिशय कठीण गेले,’’ असे जयवर्धनेने सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन सामने अनुक्रमे १६ आणि २४ जुलैला सुरू होतील, त्यानंतर ऑगस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दोन मालिका अनुभवी जयवर्धने खेळणार आहे. मात्र यापुढेही तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे २०१५मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत तो खेळू शकेल. १९९७मध्ये जयवर्धनेने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
जयवर्धनेची कसोटी कारकीर्द
सामने धावा शतके अर्धशतके
१४५ ११,४९३ ३३ ४८