भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे स्पष्ट मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्णधारपदाचे विभाजन करणे परदेशी संघांकरिता योग्य ठरत असेल. मात्र भारतीय खेळाडूंची मानसिकता लक्षात घेतली तर कसोटीसाठी एक व अन्य स्वरूपांच्या सामन्यांसाठी दुसरा कर्णधार असणे अयोग्य आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

गहुंजे येथे रविवारी होणाऱ्या भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पाश्र्वभूमीवर धोनीने पत्रकारांशी संवाद साधला. कर्णधारपदाचा त्याग केल्यामुळे कोणतेही दडपण नसल्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे त्याने दिली.

कर्णधारपदाची धुरा दुसऱ्याकडे सोपवल्यावर कसे वाटत आहे, असे विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘आता खऱ्या अर्थाने माझ्यावरील ओझे कमी झाले आहे. अर्थात संघातील एक खेळाडू म्हणून माझ्यावरील जबाबदारी कायमच राहणार आहे. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड आदी देशांमध्ये वेगवेगळय़ा स्वरूपाच्या क्रिकेटसाठी वेगवेगळे कर्णधार चालू शकतात. मात्र भारतीय संघाबाबत असे करणे फारसे रुचणारे नाही. विराट कोहलीकडे कसोटीसाठी कर्णधारपद दिल्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून तो स्थिरावल्यानंतर त्याच्याकडे सर्वच संघांचे नेतृत्व सोपवणे योग्य जावे, यासाठीच मी कर्णधारपदाचा त्याग केला.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘यष्टिरक्षक म्हणून मी सदोदित कोहलीला साहाय्य करीन. यष्टिरक्षक हा अप्रत्यक्षरीत्या उपकर्णधारपदासारखीच भूमिका बजावत असतो. कारण त्याला प्रतिस्पर्धी फलंदाज व आपले सहकारी गोलंदाज यांचे गुणदोष बारकाईने पाहणे शक्य होत असते.’’

‘‘कोहलीकडे भारताला विश्वचषक जिंकून देण्याची क्षमता आहे. त्याच्या सुदैवाने आताच्या संघातील अनेक खेळाडू देशाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी लायक आहेत. सध्याच्या संघातील खेळाडू व भारतीय संघाच्या उंबरठय़ावर असलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्यासाठी उत्तम नैपुण्य लाभलेले खेळाडू आहेत. संघातील कोणत्या खेळाडूकडे सामन्यात विजयश्री खेचून आणण्याची क्षमता आहे, याची जाणीव आहे. मी भारताला कर्णधार म्हणून जेवढे यश मिळवून दिले, त्यापेक्षा जास्त यश भारतीय संघ कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवेल, अशी मला खात्री आहे,’’ असेही धोनीने सांगितले.

संघात कोणत्या स्थानावर खेळण्यास प्राधान्य देणार, असे विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘शक्यतो मी तळातील क्रमांकावर खेळण्यास पसंती देईन, कारण शेवटच्या सहा-सात षटकांमध्ये आक्रमक फलंदाजीची गरज असते व नेमके शेवटच्या फळीतील फलंदाजांवर ही षटके खेळण्याची वेळ येत असते. अर्थात, सामन्यातील स्थिती पाहून व कर्णधाराच्या सल्ल्यानुसारच मी फलंदाजीला येईन.’’

डोक्यावरील ओझे दूर झाले म्हणून..

धोनीने कारकीर्दीतील सुरुवातीच्या काळात डोक्यावर भरपूर केस ठेवले होते. आता त्याच्या डोक्यावर तुरळक केस पाहावयास मिळतात. त्याबाबत विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘कर्णधारपदाची प्रतिष्ठेची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे केस वाढवणे हे त्या पदाला योग्य वाटत नव्हते. आता नेतृत्वाचे ओझे दूर झाले आहे. साहजिकच पूर्वीसारखी केशरचना करण्याकडे माझा कल असणार आहे.’’