चेन्नई : महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई हे आता एक समीकरणच झाले आहे. धोनीविना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा विचारही अवघड वाटतो. चेन्नईकरांचे धोनीप्रेम हे चेपॉक स्टेडियमसमोरच असलेल्या एका क्रीडा साहित्य विकणाऱ्या दुकानाच्या नावावरूनच अधोरेखित होते. ‘धोनी स्पोर्ट्स’ नामक या दुकानाबाबत गेल्या काही दिवसांत बरीच चर्चा झाली आहे.
चेपॉक स्टेडियमला जाताना ‘धोनी स्पोर्ट्स’ या पाटीवर नजर जातेच. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये दुकानाबाबत बऱ्याच बातम्या आल्या. समाजमाध्यमांवरही या दुकानाच्या पाटीचे छायाचित्र गाजले. ‘‘ही प्रसिद्धी धोनी या नावामुळे मिळाल्याची पूर्ण जाण असली, तरी लोक आमच्याकडे वारंवार येतात कारण आम्ही सर्वोत्तम क्रीडा साहित्य विकतो,’’ असे या दुकानाचे मालक सय्यद शाहबाझ विश्वासाने सांगतो.
हेही वाचा >>>IND vs AUS, World Cup 2023: शानदार इनिंग खेळूनही विराट दिसला नाराज, कपाळावर मारुन घेतानाचा VIDEO व्हायरल
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या दिवशी या दुकानासमोर बरीच गर्दी पाहायला मिळाली. विश्वचषकातील या सामन्यापूर्वी सय्यदशी संवाद साधला असता तो म्हणाला, ‘‘इतक्या प्रमाणात लोक आमच्याकडे येतील अशी अपेक्षा अजिबातच नव्हती. धोनी हे नाव खूप मोठे आहे. त्यामुळे ते टिकवण्यासाठी आमच्यावरही मोठी जबाबदारी आहे.’’
‘‘चेन्नईमध्ये धोनी सर्वाचाच लाडका आहे. २०१४मध्ये माझ्या चुलत भावाच्या मुलाचा जन्म झाला, त्याचे नाव आम्ही धोनी ठेवले होते. मग आम्ही दुकानाचे नावही धोनीच ठेवण्याचा निर्णय घेतला. या नावामुळे लोकांना दुकानाबाबत आपलेपणा वाटेल याची आम्हाला खात्री होती. तसेच झालेही,’’ अशी दुकानाच्या नावामागची कहाणी सय्यदने सांगितली.