परदेश दौऱयात भारतीय संघाच्या ‘ड्रेस-कोड’ बाबतीतील नियम शिथील करून ब्लेझर ऐवजी टी-शर्ट घालण्याची परवानगी देण्यात येण्याबद्दलची टीम इंडियाची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) मान्य केली असून धोनी ब्रिगेड इंग्लंड दौऱयासाठी लंडन विमानतळावर कॅज्युअल पोशाखातच दाखल झाली.
दूरच्या परदेश दौऱयासाठी खेळाडूंना पारंपारिक ब्लेझर घालून प्रवास करणे गैरसोयीचे ठरते त्यामुळे ब्लेझर ऐवजी टी-शर्ट परिधान करु देण्याची खेळाडूंची विनंती मान्य करण्यात आल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव संजय पटेल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, “टीम इंडियाचा पारंपारिक पोशाख असलेला ब्लेझर आणि फॉर्मल्स परिधान करुन पाच ते सहा तासांचा प्रवास करणे खेळाडूंना गैरसोयीचे ठरते. त्यामुळे खेळाडूंच्या विनंतीला मान देऊन प्रवासा दरम्यान, पारंपारिक पोशाखा ऐवजी टी-शर्ट घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, परदेश दौरय़ात भारतीय संघाच्या अधिकृत कार्यक्रमांत तसेच डिनर कार्यक्रमांत खेळाडूंना ब्लेझर आणि फॉर्मल्स परिधान करणे बंधनकारक आहे. असेही संजय पटेल म्हणाले.

‘इकोनॉमी क्लास’ ऐवजी ‘बिझनेस क्लास’मधून प्रवास..

दूरच्या परदेश दौऱयावेळी ‘इकोनॉमी क्लास’ ऐवजी ‘बिझनेस क्लास’मधून विमान प्रवासाची टीम इंडियाची मागणीही ‘बीसीसीआय’ने मान्य केली असल्याचे संजय पटेल म्हणाले. ‘बीसीसीआय’ने आजवर जी काही उंची गाठली आहे त्याचे संपूर्ण श्रेय भारतीय खेळाडूंना आहे. त्यामुळे टीम इंडिया दूरच्या परदेश दौऱयांवेळी ‘बिझनेस क्लास’मधून प्रवास करेल असे संजय पटेल म्हणाले.

Story img Loader