पीटीआय, अहमदाबाद
पुढील वर्षी आणखी एक इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) हंगामात खेळण्याचा प्रयत्न करेन, असे ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला. सोमवारी चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर पाच गडी राखून विजय मिळवत आपले पाचवे ‘आयपीएल’ विजेतेपद पटकावले. या हंगामाच्या सुरुवातीला धोनीचे हे अखेरचे ‘आयपीएल’ सत्र असल्याची चर्चा होती. मात्र, त्याच्या या वक्तव्यानंतर तो आणखी एक हंगाम खेळण्याची शक्यता वाढली आहे.
‘‘परिस्थिती पाहिल्यास निवृत्ती घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मी निवृत्ती घेत आहे, हे म्हणणे खूप सोपे आहे. मात्र, आगामी नऊ महिन्यांत कठोर मेहनत घेऊन पुनरागमन करत आणखी एक सत्र खेळणे कठीण आहे. यासाठी शरीराची साथ मिळणेही आवश्यक आहे,’’ असे सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला. या हंगामात चेन्नईचा संघ ज्या ठिकाणी खेळला, त्या ठिकाणी क्रिकेट चाहते धोनीला खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमध्ये गर्दी करताना दिसले.
‘‘चेन्नईच्या चाहत्यांना ज्याप्रमाणे मला प्रेम दिले. मी आणखी एक हंगाम खेळल्यास त्यांच्यासाठी ते मोठी भेट असेल. ज्याप्रमाणे ते माझ्यासाठी सदैव उभे राहिले. मलाही त्यांच्यासाठी काही करायचे आहे. माझ्या कारकीर्दीतील हा अखेरचा काळ आहे. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात संपूर्ण स्टेडियममध्ये माझे नाव घुमत होते. त्यामुळे पुनरागमन करून जेवढे खेळणे मला शक्य होईल, तेवढे मी खेळेन,’’ असे धोनीने सांगितले.
नियतीने धोनीसाठी हे लिहिले होते -हार्दिक
नियतीने महेंद्रसिंह धोनीसाठी हे लिहिले होते, असे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंडय़ा आपले मार्गदर्शक आणि चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक करताना म्हणाला. हार्दिक अंतिम सामन्यातील पराभवानंतर म्हणाला,‘‘मी धोनीसाठी खूप आनंदी आहे. नियतीने त्याच्यासाठी हे लिहिले होते. मला पराभूत व्हायचे असेल तर त्याच्याकडून पराभूत झाल्यास मला काहीही अडचण नाही. चांगल्या व्यक्तींसोबत चांगल्या गोष्टी होतात. मी ज्या काही चांगल्या व्यक्तींना ओळखतो, त्यांपैकी धोनी एक आहे. देवाने माझ्यावर नेहमीच कृपा केली आहे. मात्र, हा दिवस धोनीचा होता.’’