न्यूझीलंड संघातील अनेक खेळाडूंमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करण्याची क्षमता आहे, त्यामुळेच आम्ही त्यांना कमी लेखत नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने येथे सांगितले.
भारत व न्यूझीलंड यांच्यातील एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेस १९ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे सोमवारी येथे आगमन झाले. एक दिवसीय सामन्यांनंतर भारतीय संघ पुढील महिन्यात न्यूझीलंडबरोबर दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. या मालिकेबाबत धोनी म्हणाला,‘‘न्यूझीलंडकडे अनुभवी व प्रभावी गोलंदाज आहेत. त्यांनी यंदाच्या मोसमात प्रभावी कामगिरी केली आहे. विशेषत: घरच्या मैदानावर त्यांनी चांगले यश मिळविले आहे. आमच्यापेक्षा खेळपट्टी व हवामान याचा फायदा त्यांना जास्त मिळणार आहे.
आमच्या संघातील ज्या खेळाडूंना येथील वातावरण व खेळपट्टी नवीन आहे त्यांना येथे यश मिळविण्यासाठी झुंजावे लागणार आहे. मात्र युवा खेळाडूंना हा दौरा खूपच उपयुक्त ठरणार आहे.’’
‘‘न्यूझीलंडकडील अनेक खेळाडूंकडे सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता आहे. त्यांचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे भारतीय खेळाडूंचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. हे लक्षात घेऊनच आम्ही प्रत्येक सामना गांभीर्याने घेणार आहोत’’ असेही धोनी याने सांगितले.

Story img Loader