Mahendra Singh Dhoni on Podcast: आयपीएलच्या १८व्या सीझनमध्ये विराट-रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण आख्ख्या आयपीएलमध्ये किमान ३०० खेळाडू असताना सर्वाधिक चर्चा होताना दिसते ती म्हणजे भारताचा माजी कर्णधार आणि ‘कॅप्टन कूल’ म्हणून चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असणारा ‘माही’ अर्थात CSK चा थलैवा महेंद्रसिंग धोनी! चेन्नईच्या प्रत्येक सामन्यात ‘माही भाई’बद्दलचं चाहत्यांचं भरभरून प्रेम ओसंडून वाहताना दिसतं. पण देशभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वोच्च स्थानी असणाऱ्या माहीसाठी आयुष्यात दोन तत्वं ही सर्वोच्च आहेत. त्यानं स्वत: त्याबद्दल सांगितलं आहे.

महेंद्रसिंग धोनी इतका कूल, इतका परफेक्ट, इतका शार्प किंवा इतका कुशल कसा आहे? असा प्रश्न अजूनही कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना पडतो. पण स्वत: महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात दोन तत्वांना सर्वोच्च महत्त्व आहे. त्याच्यामते या तीन तत्वांनीच त्याचं संपूर्ण आयुष्य घडलं असून त्याच्या पुढच्या पिढीलाही तो हेच सांगणार आहे! क्रिकट्रॅकरशी झालेल्या संवादामध्ये माहीनं या दोन तत्वांबद्दल सविस्तर भूमिका मांडली आहे.

शिस्त आणि कठोर मेहनत…

महेंद्रसिंग धोनीनं यावेळी शिस्त आणि कठोर मेहनत ही आपल्या आयुष्याची दोन मूलभूत तत्वं असल्याचं नमूद केलं. “शिस्त आणि कठोर मेहनत ही आयुष्याची मूलभूत तत्व आहेत. मी अधिक स्पष्टपणे सांगतो. शिस्तीसंदर्भात मी माझ्याबद्दल बोलतोय. क्रिकेटच्या बाबतीत मी जितकी शिस्त पाळतो, तितकीच शिस्त मी व्यावसायिक असतो तर पाळली असती. कारण व्यक्ती म्हणून मी तोच आहे. त्यामुळे शिस्त, मग ती अगदी वक्तशीरपणाच्या बाबतीतली असेल, तरी ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. माझा त्यावर विश्वास आहे”, असं माहीनं सांगितलं आहे.

“अर्थात, काही वेळा हे माझ्याही नियंत्रणात नसतं. कधीकधी मी त्या बाबतीत थोडासा निष्काळजीही होतो”, असं महेंद्रसिंग धोनी राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला.

कठोर मेहनतीचं महत्त्व..

कठोर परिश्रमाचा वारसा आपल्याला आपले वडील आणि आजोबांकडून मिळाल्याचं धोनी सांगतो. कठोर मेहनत करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो, असंही धोनीचं मत आहे.

“कठोर मेहनतीला पर्याय नाही. माझे वडील आणि आजोबाही हेच सांगायचे. मीही हेच सांगेन. माझी पुढची पिढीही हेत सांगेल. लोकांचं याबाबतीत वेगळं मत असू शकतं. एखादी आळशी व्यक्ती काम पूर्ण करण्यासाठी सगळ्यात कमी मेहनत लागणारा मार्ग शोधून काढू शकतो. पण तो मार्गही त्याला कठोर मेहनत वाटतो कारण तो मुळातच आळशी आहे. त्यामुळे कठोर मेहनत ही कायमच महत्त्वाची गोष्ट आहे”, असं महेंद्रसिंग धोनीनं सांगितलं.